दोन दिवसात एक लाख ६५ हजार जणांनी घेतला लाभ
पुणेकर मेट्रोला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि नाहक वाया जाणारा वेळ यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील दोन दिवसांत तब्बल एक लाख ६५ हजार २५६ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. ही संख्या आत्तापर्यंतची सर्वाधिक ठरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे एक ऑगस्टला लोकार्पण झाले. त्यामुळे, पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन शहरे मेट्रोने जोडली गेली. यात पिंपरी-चिंचवड महापालिका ते शिवाजीनगर न्यायालय आणि वनाज ते रूबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांचा समावेश होता. उद्घाटनांतर सहा ऑगस्टला दोन्ही मार्गांवर ९६ हजार ४९८ प्रवाशांनी प्रवास केला होता.
त्यानंतर आता १५ ऑगस्टला प्रवासी संख्येने उच्चांक गाठला. १५ ऑगस्टला १ लाख २३ हजार ७२० प्रवाशांनी प्रवास केला. १४ व १५ ऑगस्ट, या दोन दिवसांत दोन्ही मार्गांवर एक लाख ६५ हजार २५६ प्रवाशांनी प्रवास केला. दरम्यान, मेट्रोच्या प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मेट्रोची सेवा आजपासून सकाळी एक तास आधी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वनाज ते रुबी हॉल आणि सिव्हील कोर्ट ते पिंपरी-चिंचवड या मार्गांवर सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मेट्रोची सेवा दिली जाणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.