Pune double decker bus :‘डबल डेकर’ बससाठी पुणेकरांना...

पुणेकरांच्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेत ‘डबल डेकर’ बसचा समावेश होणार आहे. अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी चांगलीच रंगली होती. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यात डबल डेकर दाखल होईल असे वाटत होते. मात्र मुंबई बेस्टच्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसच्या संचलनाचा अनुभव घेतल्यानंतरच पुण्यात डबल डेकर बसचा विचार केला जाईल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने ‘सीविक मिरर’ ला दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 20 Sep 2023
  • 03:14 pm
Pune double decker bus :

‘डबल डेकर’ बससाठी पुणेकरांना प्रतीक्षाच

मुंबई बेस्टच्या इलेक्ट्रिक 'डबल डेकर' बसच्या अनुभवानंतरच पीएमपी घेणार निर्णय, चार्जिंग स्टेशनही अपुरे

अमोल अवचिते 

पुणेकरांच्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेत ‘डबल डेकर’ बसचा समावेश होणार आहे. अशी चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी चांगलीच रंगली होती. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यात डबल डेकर दाखल होईल असे वाटत होते. मात्र मुंबई बेस्टच्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसच्या संचलनाचा अनुभव घेतल्यानंतरच पुण्यात डबल डेकर बसचा विचार केला जाईल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने ‘सीविक मिरर’ ला दिली.

मुंबईनंतर पुण्यातही 'डबल डेकर' घेण्याच्या प्रस्तावाला पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २० इलेक्ट्रिक डबल डेकर बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीला नऊ महिने होऊन गेले आहेत. परंतु आता हा प्रस्ताव सध्या गुंडाळण्यात आला आहे. इलेक्ट्रिक डबल-डेकर बस खरेदी आणि चालविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार होती. या बसेस पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात धावतील अशा ४० मार्गांना अंतिम रूपही देण्यात आले होते. हडपसर, कात्रज आणि कर्वे रस्त्यावरील प्रवासी डबल डेकर बसने प्रवास करतील असे नियोजन करण्यात आले होते. पीएमपीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार होती. त्यानंतर डबल डेकर बस खरेदीला गती दिली जाणार होती. मात्र सद्या असलेल्या इलेक्ट्रिक बसला चार्जिंग स्टेशन अपुरे पडत आहेत. पीएमपीकडून भाडेतत्त्वावर १०० ई-बस घेतल्या जाणार आहेत. मात्र या बसला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून पीएमपी ई बसच्या प्रतीक्षेत आहे. तसेच पीएमपीच्या ताफ्यात सप्टेंबरमध्ये १९ ई-बस दाखल होणार आहेत. या बस मागच्या वर्षीच दाखल होणार होत्या. मात्र बसची बॅटरी उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम बसच्या उत्पन्नावर झाला आहे. आहेत त्याच ई बस रस्त्यावर धावण्यासाठी पीएमपीला कसरत करावी लागत आहेत. त्यामुळेच डबल डेकर बसचा निर्णय लांबणीवर टाकला असल्याची चर्चा रंगली आहे.

 पालकमंत्र्यांनी डबल डेकर बससाठी तयारी करण्याच्या दिल्या होत्या सूचना...

पुण्यात होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक चांगलेच त्रासले आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होणे आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करून प्रवासी संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. तसेच अधिक प्रवाशांना सेवा मिळावी, यासाठी मुंबईप्रमाणे पुण्यात डबल डेकर बस असावी, अशी चर्चा केली जात होती. त्यामुळे शहरात डबल डेकर बस सुरू करण्यासाठी लवकरात लवकर तयारी पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्यानंतर पीएमपीकडून सावध पावले टाकली जात आहेत.

९० च्या दशकाच्या सुरुवातीला पुण्यात होती डबल डेकर बस...

तत्कालीन पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टने ९० च्या दशकाच्या सुरुवातीला पुण्यात डबल डेकर बस सेवा  सुरू केली होती. जी मुख्यतः शिवाजीनगर आणि निगडीदरम्यान धावत होती, कारण बहुतेक कार्यालये याच मार्गावर होती. नियोजनानुसार सर्व काही झाले तर पुन्हा एकदा डबल डेकर बस शहराच्या रस्त्यावर धावताना दिसतील. त्यामुळे पुण्यात कितपत डबल डेकर बसचा विचार होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पीएमपी प्रशासनाचा सध्या डबल डेकर बस घेण्याचा कोणताही विचार नाही. बेस्ट कडून ई-डबल डेकर घेतल्या जात आहेत. त्या मार्गावर कशाप्रकारे धावतील. कोणत्या अडचणी येतात का, याचा विचार केला जाईल. यासाठी साधारणपणे सहा ते सात महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर पीएमपीकडून विचार केला जाईल.

 - सतीश घाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी.

पीएमपी प्रशासन जे ठरवते ते कधीच होत नाही. आहे त्याच बस चालवण्यासाठी पीएमपीला कसरत करावी लागते आहे.

डबल डेकर बससाठी रस्ते चांगले हवेत. मेट्रोचा विचार केला तर डबल डेकर बस चालू शकणार नाही असे वाटते. कोणतीही योजना आखताना शाश्वती हवी. पीएमपीने एखादी डबल डेकर बस ट्रायल बेसवर घ्यावी. नंतर अडचणी समजून घ्याव्यात. त्यानंतर योग्य निर्णय घ्यावा.

 - जुगल राठी, अध्यक्ष पीएमपी प्रवासी मंच.

शहरात ज्या मार्गांवर प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्या मार्गावर डबल डेकर बस दाखल करावी. डबल डेकर बसमुळे अधिक प्रवासी वाढतील. एकाच वेळी अनेक प्रवाशांना प्रवास करता येईल. वेळेची बचत होण्यास मोठी मदत होईल. पीएमपीने डबल डेकर बस ट्रायल बेसवर घ्यावी.

- प्रकाश भोसले, प्रवासी.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest