संग्रहित छायाचित्र
पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (BJ Govt Medical College) आणि ससून सामान्य रुग्णालयातील पदव्युत्तर पहिल्या वर्षीच्या दोन विद्यार्थिनींना टार्गेट करून रॅगिंग (Raging) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणात महिला आयोगाला पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी स्वत:हून याची दखल घेत रुग्णालयास पाच दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
घटना गंभीर असूनही विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि घटनांबाबत मौन बाळगत कॉलेज प्रशासनाने यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला आहे. वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी दोन्ही विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाकडे केल्या होत्या. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या रॅगिंग विरोधी समितीने तक्रारींचा तपास करून तक्रारदार, बाकीच्यांची चौकशी केली होती. हा चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर यांच्याकडे पाठविण्यात आला होता. मात्र, या अहवालावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली. यामध्ये ॲनेस्थेशियाच्या डॉक्टर ऑफ मेडिसिनच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या कनिष्ठ निवासी डॉक्टरला वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या गटाने रॅगिंग केले आणि धमकी दिली. २४ वर्षीय महिला निवासी डॉक्टरांनी रुग्णालय प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. फिर्यादीनुसार ही घटना मार्च आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घडली. तिने कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर बीजेएमसीने या घटनेची चौकशी सुरू केली. पदव्युत्तर (पीजी) तक्रार निवारण समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि या संदर्भात अहवाल सादर करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सीविक मिरर’शी बोलताना एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले की, “महाविद्यालय प्रशासनाने एका प्रकरणाचा तपास पूर्ण केला असून त्याचा अहवाल सोमवारी मुंबईतील वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तक्रारदार विद्यार्थिनींपैकी एक सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे आणि आता पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही विद्यार्थिनींनी संबंधित विभागात असताना वरिष्ठांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार केल्याची माहिती आहे. समितीत १३ सदस्य आहेत. चौकशीअंती अहवाल वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई यांना पाठविल्याची माहिती महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकरणांमुळे बी. जे. मेडिकल कॉलेज चर्चेत आहे. निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबर रोजी दारू पार्टी केली होती. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ससूनचे डीन डॉ. विनायक काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला. दुसऱ्या एका डॉक्टरचा दावा आहे की हे दोन महिला डॉक्टरांमधील भांडण आहे आणि रॅगिंगचा काहीही संबंध नाही.
‘सीविक मिरर’शी बोलताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, “हे कृत्य धक्कादायक आहे. या प्रकारच्या घटनांची माहिती महिला आयोगाला देणे बंधनकारक आहे. कोणतीही शासकीय संस्था महिला आयोगाला अंधारात ठेऊ शकत नाही. त्यामुळे या दोन्ही पीडित महिला डॉक्टरांना मी भेटणार आहे. पाच दिवसांत याचा अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.