झाडांचा कचरा उचलण्यासाठी ५ ग्रॅबर ट्रॅक्टर दाखल
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहरातील नागरिकांना कचऱ्या पासून लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, झाडांचा कचरा उचलण्यासाठीचे काम देण्यात आलेल्या ठेकेदारांकडून ५ ग्रॅबर ट्रॅक्टर महापालिकेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता वेगाने कचरा उचलला जाणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांच्या हस्ते या ग्रॅबर ट्रॅक्टरचे उद्घाटन करण्यात आले आहे.
पुण्यात झाडे तोडणे, पावसामुळे होणारी पडझड यासह अनेक गोष्टींमुळे कचरा साचतो. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कचरा उचलण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन रोगराई वाढण्याची शक्यता असते. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले हे ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. जेसीबी प्रमाणे जवळपास पंधरा फूट उंची पर्यंत ते झाडांच्या फांद्या तसेच इतर कचरा उचलून थेट गाडीत टाकतात.
प्रत्येक झोनसाठी एक या प्रमाणे हे ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे, आठ कामगार एका तासात करणारे काम हा ट्रॅक्टरद्वारे अवघ्या ५ ते १० मिनिटात केले जात असल्याने झाडांच्या फाद्यांचा तसेच इतर लाकडाचा कचरा उचलण्याच्या कामास गती येणार आहे. या शिवाय, साठून पडलेल्या कचऱ्यात अनेकदा साप तसेच इतर किडयांसह, महावितरणच्या केबलचा धोका असतो. हा धोकाही या ट्रॅक्टर मुळे कमी होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.