संग्रहित छायाचित्र
पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने रेल्वेसेवा बुधवारी सकाळी विस्कळीत झाली. मालगाडी दीड तास लोहमार्गावर अडकली होती. सकाळी १० वाजून ५३ मिनिटांनी मालगाडीला दुसरे इंजिन लावल्याने मुंबई-पुणे दरम्यानच्या प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला.
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन शेलारवाडी नजीक सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी बंद पडले. यामुळे मालगाडी लोहमार्गाव एकाच जागी अडकून पडली. अकेर घोरपडी यार्डातून दुसरे इंजिन आणून मालगाडीला जोडण्यात आले. त्यानंतर सकाळी १० वाजून ५३ मिनिटांनी मालगाडी पुढे मार्गस्थ झाली. या सुमारे दीड तासांच्या कालावधीत पुणे-मुंबई दरम्यानच्या गाड्यांना विलंब झाला.
याबाबत माहिती देताना रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शाह म्हणाल्या की, मालगाडीचे इंजिन अचानक बंद पडल्याने इतर गाड्यांना विलंब झाला. याचा फटका प्रवाशांना बसला. सुदैवाने इंद्रायणी एक्स्प्रेस त्याआधीचे पुढे गेल्याने ती पुणे स्थानकावर वेळेत पोहोचू शकली. मात्र, मुंबई-पुणे इंटरसिटीला ८८ मिनिटे विलंब झाला तर तळेगाव-पुणे लोकल ६९ मिनिटे, मुंबई-विशाखापट्टणम ५३ मिनिटे, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस १७ मिनिटे आणि लोणावळा-पुणे लोकलला २१ मिनिटे विलंब झाला. या गाड्या तळेगाव आणि कामशेत स्थानकावर थांबवण्यात आल्या होत्या.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.