पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग आज पुन्हा दोन तासाचा ब्लॉक
पुणे-मुंबई द्रुतगतीमार्ग आज पुन्हा एकदा दोन तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज (गुरुवारी) दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून, धोकादायक सैल झालेले दगड आणि माती काढण्याचे काम करण्यात येणार आहे. यावेळी एक्सप्रेस वेवरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. केवळ हलक्या वाहनांसाठी जुना पुणे-मुंबई महामार्गावर शिंग्रोबा घाटातून वाहतूक सुरू राहील, अशी माहिती बोरघाट पोलिसांनी दिली आहे.
तीन दिवसांपूर्वी पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याने मोठी घटना घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक तब्बल १७ तास खोळंबली होती. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर द्रुतगती मार्गावरील दरड बाजूला करून दोन लेनवरून मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरळीत केली होती.
दरम्यान, पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन सैल झालेले दगड माती काढण्यासाठी बारा ते दोनच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.