पुणे: बसथांब्याजवळील होर्डिंग कोसळले; खराडीतील उबाळेनगर येथील घटना

पुण्यातील अनेक भागात बुधवारी (दि. १७) संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी पुण्याच्या पूर्व भागातील खराडीसह, वाघोली, मांजरी गावांना गारांच्या पावसाने झोडपले. बोराएवढ्या गारा जमिनीवर कोसळल्या.

बसथांब्याजवळील होर्डिंग कोसळले; खराडीतील उबाळेनगर येथील घटना

शहराच्या पूर्व भागाला गारांच्या पावसाने झोडपले; वीजपुरवठा खंडित तसेच वाहतूक कोंडीने नागरिकांचा श्वास कोंडला

पुण्यातील अनेक भागात बुधवारी (दि. १७) संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी पुण्याच्या पूर्व भागातील खराडीसह, वाघोली, मांजरी गावांना गारांच्या पावसाने झोडपले. बोराएवढ्या गारा जमिनीवर कोसळल्या. पाऊस सुरु असताना सोसाट्याचा वारा सुटला होता. या वाऱ्यात खराडीतील उबाळेनगरमधील मोठे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतही जावीत हानी झाली नसल्याचे पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

पुणे शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारनंतर काही भागात पावसाला सुरूवात झाली. खराडी, मांजरी, वडगावशेरी, शुक्रवार पेठ येथे झाडपडीमुळे वाहनांचे नुकसान झाले. तर कसबा पेठेत भिंत पडल्याची घटना घडली. पावसासोबत सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वाऱ्याचा वेग इतका होता की यात  उबाळेनगर बसथांब्याजवळील आणि रुद्र मोटर्स येथील मोठे होर्डिंग कोसळले.  

पावसाला सुरुवात होताच नगर रस्त्याला नदीचे स्वरुप आले होते. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील झाली होती. पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या तीन ते चार किलोमीटर  रांगा लागल्याने वाहतूक कोंडीत वाहन चालकांचा श्वास कोंडला. त्यात विद्युत तारा तुटल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. परिसरात अंधार पसरला होता. तसेच विद्युत तारा तुटल्याने दोन चारचाकींचे नुकसान झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.

वाघोलीतदेखील गारांसह जोरदार पाऊस झाला. भावडी रोडला नदीचे स्वरूप आले होते. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या कमानी, बोर्ड तुटले तर अनेक होर्डिंगच्या फ्लेक्सचे कापड फाटून इतरत्र उडाले होते. पुणे-नगर महामार्गालगतही काही ठिकाणी पाणी साचले होते. यातून वाट काढत वाहनचालकांनी घराचा रस्ता गाठला.  

खराडी, वाघोलीतील लाईट गायब

जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जोराच्या वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटल्या. तसेत खबरदारी म्हणून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. दोन ते तास खराडी, वाघोली, मांजरी परिसरात वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिक त्रासले होते. तसेच या भागात मंगळवारी (दि. १६) संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री एक-दीड वाजेपर्यंत विदुयत पुरवठा खंडित झाल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.

पुणे शहराच्या पूर्व भागात गारांसह पाऊस झाला. जोराचा वारा असल्याने उबाळेनगर येथील होर्डिंग पडले. तसेच खराडीतील ब्लू बेरी सोसायटी येथे झाडपडीची घटना घडली. इतर कोणत्याही तक्रारी आल्या नाहीत. पुणे महापालिकेने मुंबई शहराच्या धर्तीवर आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला आहे. या कक्षात १२ जण तैनात करण्यात आले आहेत.  नागरिकांनी २५५०६८०० या क्रमांकावर तक्रार करावी.
 - गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन विभागप्रमुख, पुणे महापालिका

नगर रस्ता परिसरात पाहणी करण्यात येत होती. पावसाला सुरुवात झाल्यानंतर जोरदार वाराही सुटला. यामुळे उबाळेनगर येथील ४० बाय २० या आकाराचे होर्डिंग आमच्यासमोर कोसळले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका चारचाकीचे नुकसान झाले. या होर्डिंगला महापालिकेकडून परवाना देण्यात आला आहे. 
- गणेश भारती, मुख्य परवाना निरीक्षक, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest