पुणे : रक्ताने माखताहेत अल्पवयीनांचे हात

अल्पवयीन मुलांमध्ये वाढीस लागलेली गुन्हेगारी ही आजघडीला अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. मागील काही वर्षांत या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे.

Pune Crime News

Pune Crime News

अवघ्या २४ तासात दोन अल्पवयीन मुलांचा आरोपींनी केला खून

अल्पवयीन मुलांमध्ये वाढीस लागलेली गुन्हेगारी ही आजघडीला अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. मागील काही वर्षांत या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. पालक-शिक्षक-कायदा आणि समाज या मुलांची गुन्हेगारीकडे वळणारी पाऊले रोखण्यात अयशस्वी ठरताना दिसतो आहे. अल्पवयीनांच्या हाती घातक शस्त्र पडू लागल्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्याकडे त्यांचा कल वाढू लागला आहे. पुण्यात अवघ्या २४ तासात दोन अल्पवयीन मुलांचे खून अल्पवयीन मुलांच्याच हातून झाल्याच्या घटना सिंहगड रस्ता, रामटेकडी येथे घडल्या आहेत. तर, वाघोली येथे एका १९ वर्षांच्या मुलाने ४५ वर्षीय व्यक्तीचा खून केला. या घटनांनी पुणे हादरले आहे.

सिंहगड रस्त्यावर गणेशोत्सवामध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीत झालेल्या किरकोळ वादातून १७ वर्षीय मुलाचा धारदार हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. ही घटना वडगाव बुद्रुक येथे घडली. या गुन्ह्यातील आरोपी अल्पवयीन आहेत. श्रीपत अनंत बनकर (वय १७, निवृत्तीनगर, वडगाव बुद्रक) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीपत आणि अल्पवयीन आरोपी मुले निवृत्तीनगर भागात राहायला आहेत. यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत त्यांचा श्रीपतसोबत वाद झाला होता.

तेव्हापासून त्यांच्या मनात त्याच्याविषयीचा राग धुमसत होता.

श्रीपत त्याच्या मित्रासह दुचाकीवरून मंगळवारी (दि. ३) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जात होता. त्यावेळी आरोपी मुलेदेखील चरवड वस्ती परिसरातून जात होती. त्यांना श्रीपत जाताना दिसला. त्यांनी त्याला आवाज देऊन थांबवले. त्याला ‘‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’’ असे म्हणत त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले. चिडलेल्या आरोपींनी धारदार कोयत्यांनी श्रीपतवर वार करण्यास सुरुवात केली. तसेच, त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने जखमी श्रीपतला उपचारांसाठी रुग्णालयात हलवले. मात्र, त्याचा त्यापूर्वीच मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष भांडवलकर आणि पथकाने आरोपींचा शोध घेऊन पर्वती टेकडी परिसरातून त्यांना ताब्यात घेतले.

दुसरी घटना रामटेकडी येथे घडली. जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका १७ वर्षांच्या मुलाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटनादेखील मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. यश सुनील घाटे (वय १७, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ प्रज्वल (वय २०) याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी साहिल लतीफ शेख (वय १८) आणि ताहीर खलील पठाण (वय १८) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यश हा त्याचे मित्र आदित्य, रेहान पठाण, श्रेयस शिंदे यांच्यासह कॉलेजला निघालेला होता. जामा मशिदीसमोरून जात असताना जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी त्यांना अडवले. यश याच्यावर धारदार हत्याराने वार करून आरोपी पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या यशचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तिसरी घटना वाघोली येथे घडली. एका १९ वर्षीय मुलाने सुमारे ४५ वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना बुधवारी (दि. ४) दुपारी एकच्या सुमारास वाघोली गावच्या हद्दीत असलेल्या रोहन अभिलाषा साईटवरील लेबर कॅम्पमध्ये घडली. राजू लोहार (रा. दरेकर वस्ती, लोहगाव-वाघोली रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी साहिल दस्तगीर शेख (वय १९, रा. दरेकर वस्ती, लोहगाव-वाघोली रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही एकाच भागात राहण्यास असून एकत्रच मजुरीचे काम करतात. त्यांच्यामध्ये दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाले. त्यावेळी त्यांच्यात हाणामारीदेखील झाली. आरोपी साहिलने राजूला हाताने मारहाण केली. तसेच, त्याच्या पाठीवर दगडाने ठेचून खून केला. वाघोली पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

अलीकडच्या काळातील खुनाच्या घटना

 १. सिंहगड रस्ता परिसरात खुनाची दुसरी घटना

दोन महिन्यांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात अभय मारुती सूर्यवंशी (वय २०) याचा अल्पवयीन आरोपींनी खून केला होता. दुचाकी पुढे नेण्याच्या कारणावरुन त्यांच्यामध्ये वाद झाले होते. चिडलेल्या आरोपींनी या मुलावर कोयत्याने वार करुन खून केला होता. त्याच्यावर तब्बल ३५ वार करण्यात आले होते. घरासमोर उभा असतानाच त्याच्यावर या अल्पवयीन आरोपींनी हल्ला चढवला होता.

२. मैत्रिणीकडे चहाडी केल्याने मित्राला संपवले

दहावीत शिकणाऱ्या दोन मुलांनी त्यांच्याच शाळेत नववीमध्ये शिकणाऱ्या मुलावर धारदार कोयत्याने वार करीत त्याचा खून केल्याची घटना घेरा सिंहगड परिसरात असलेल्या मणेरवाडी येथे मार्चमध्ये घडली होती. हवेली पोलिसांनी दोन शाळकरी मुलांना ताब्यात घेतले होते. मैत्रिणीकडे चहाडी केल्यामुळे आरोपींपैकी एका मुलाचे प्रेमप्रकरण मोडले होते. त्यामुळे त्याचा थेट खूनच करण्यात आला होता. प्रकाश हरिसिंग राजपूत (वय १४, रा. मते गेट, मौजे मणेरवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी १५ आणि १७ वर्षांच्या दोन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते.

३. मोबाईल हॉटस्पॉट न दिल्याने खून

मोबाईलचे हॉटस्पॉट देण्यास नकार दिल्यानंतर झालेल्या वादातून एका फायनान्स एजन्सीचे मालक वासुदेव रामचंद्र कुलकर्णी (वय ४७, रा. हडपसर) यांचा खून करण्यात आला होता. ही घटना सप्टेंबरमध्ये घडली होती. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये तीन अल्पवयीन आरोपींचा समावेश होता. या सर्वांनी मिळून त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला होता. कुलकर्णी यांच्याकडे एका आरोपीने मोबाईलचे हॉटस्पॉट मागितले होते. त्यांनी त्याला नकार दिला होता. त्यावरून वाद झाल्यानंतर कुलकर्णी यांनी एका आरोपीच्या थोबाडीत मारली होती. या कारणावरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest