महापालिका हद्दीत शेकडो रुग्ण सापडत असताना राज्याच्या आरोग्य विभागाची बनवाबनवी; म्हणे, चिकुनगुनियाचे पुण्यात फक्त 151 रुग्ण!

पुणे शहरात चिकुनगुनियाचा उद्रेक झाला आहे. पुणे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयात दर दिवशी शेकडो चिकुनगुनिया, डेंगी आणि हिवतापाचे रुग्ण आढळत आहेत. असे असताना पुण्यामध्ये मागील तीन महिन्यांत केवळ १५१ रुग्ण आढळल्याचे राज्याच्या साथरोग विभागाचे म्हणणे आहे.

संग्रहित छायाचित्र

चिकुनगुनियासह हिवताप, डेंगीमुळे पुणेकर हैराण; प्रशासन ढिम्म


पुणे शहरात चिकुनगुनियाचा उद्रेक झाला आहे. पुणे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयात दर दिवशी शेकडो चिकुनगुनिया, डेंगी आणि हिवतापाचे रुग्ण आढळत आहेत. असे असताना पुण्यामध्ये मागील तीन महिन्यांत केवळ १५१ रुग्ण आढळल्याचे राज्याच्या साथरोग विभागाचे म्हणणे आहे.  

१५ सप्टेंबर रोजी ‘सीविक मिरर’मध्ये ‘चिकुनगुनियाच्या नव्या अवतारामुळे डाॅक्टरदेखील गोंधळात’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. पुणे शहरात दररोज प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. पुण्यासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साथरोगाचा उद्रेक असताना आरोग्य विभाग सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी साथीच्या रोगांची खरी माहिती लपवत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

 राज्याच्या आरोग्य विभागाच्या हिवताप, हत्तीरोग आणि जलजन्यरोग विभागाने पुणे शहरात चिकुनगुनियाचे केवळ १५१ रुग्ण असल्याचा अहवाल प्रसिध्द केला आहे. प्रत्यक्षात पुणे शहरातील सर्व नामांकित खासगी रुग्णालय, ससून, पुणे महापालिकेच्या कमला नेहरू, राजीव गांधी रुग्णालयासह शहरातील तीसपेक्षा अधिक दवाखान्यात दररोज शेकडो रुग्ण साथीच्या आजारामुळे तपासणीसाठी तर अनेकजण उपचारासाठी दाखल होत आहेत. तर असंख्य रुग्णांनी उपचारही घेतले आहेत. अनेकजण साथरोगाच्या साइड इफेक्टमुळे हैराण आहेत. 

अशा अवस्थेत राज्याचा आरोग्य विभाग पुण्यात चिकुनगुनियाचे केवळ १५१ रुग्ण असल्याचा अहवाल देऊन प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

आरोग्य विभागाच्या हिवताप, हत्तीरोग आणि जलजन्यरोग विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात जानेवारी २०२३ ते ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत राज्यात हिवतापामुळे २६ तर डेंगीमुळे ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. काॅलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळ अशा जलजन्य आजारामुळे ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी केवळ काॅलरामुळे २३ तर अतिसारामुळे दहाजणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात यंदाच्या पावसाळ्यात साथरोगाचा उद्रेक झाला आहे. यामध्ये हिवताप, डेंगी आणि चिकुनगुनियाचे रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. पुणे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयात गेल्या तीन महिन्यात चिकुनगुनियाचे फक्त १५१ रुग्णांची नोंद राज्याच्या आरोग्य विभागाच्या साथरोग व जलजन्यरोग विभागाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

वास्तविक पुणे महापालिकेच्या एकट्या नगर रोड (वडगाव शेरी) क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत गेल्या तीन महिन्यात २५० पेक्षा अधिक डेंगीच्या रुग्णांची नोंद आहे. त्या खालोखाल हिवताप आणि चिकुनगुनियाचे  रुग्ण आहेत. मात्र राज्याचे आरोग्य विभाग साथरोगाच्या आकडेमोड करताना बनवाबनवी करीत असल्याचे दिसते.

राज्यात जानेवारी २०२३ ते ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत हिवतापाच्या २९ हजार ५६५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी २६ जणांचा मृत्यू झाला आहे. डेंगीचे २९ हजार १२० रुग्णांची नोंद असून ७२ जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आला आहे. चिकुनगुनियाच्या चार हजार ३४५ रुग्णांची नोंद असून एकाचाही मृत्यू झाला नसल्याचे म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांत दूषित पाण्यामुळे होणा-या जलजन्य आजारामुळे काॅलरामुळे  २३ जणांचा, अतिसारामुळे दहा जणांचा तर काविळमुळे तीन वर्षांत एकाचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आरोग्य विभागाने प्रसिध्द केली आहे.

साथरोग व जलजन्य रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा अहवाल राज्य हिवताप, हत्तीरोग आणि जलजन्यरोग विभागाने दिला असला तरी प्रत्यक्षात वास्तविक संख्या देण्याऐवजी आकडेमोडी बनवाबनवी केल्याचे दिसून येते. हिवताप जनजागृती आणि उपाययोजनेसाठी आवश्यक नोकरभरती करण्यात आलेली नाही. याबाबत आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

पिंपरी-चिंचवड : साथरोग नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्याचा निधी नाही
राष्ट्रीय कीटकजन्य रोग (हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया, चंडीपुरा, हत्तीरोग) प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी डास, अळी, डास घनता नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने ग्रामीण आणि शहरी भागात घरोघरी कीटकनाशक फवारणी केली जाते. राज्यात निवडक महापालिका, नगरपालिका हद्दीत केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या कीटकनाशक तसेच अळीनाशकांचा पुरवठा केला जातो. मात्र नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड महापालिकांना कीटक रोग नियंत्रणासाठी त्यांच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी लागते. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळत नाही.

एकाच सोसायटीत सात जणांना डेंगीची लागण
येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील गेल्या महिन्यात एकाच सोसायटीत सातजणांना डेंगीची लागण झाली होती. मात्र या ठिकाणी ना धूर फवारणी करण्यात आली, ना अळीनाशक औषधांची फवारणी. या सोसायटीत सात जणांना डेंगी झाल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचा-ऱ्यांना समजली. याच क्षेत्रीय कार्यालयात झिकाचे दोन रुग्ण सापडले होते. मात्र प्रभावीपणे औषध फवारणी आणि परिसरातील गरोदर मातांचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. झिका हा परिणाम गरोदर मातेच्या पोटातील बाळाच्या मेंदूवर परिणाम करतो. त्यामुळे जन्मलेले बाळ विकलांग होऊ शकते. मात्र याचे गांभीर्य महापालिकेच्या प्रशासकांना असल्याचे दिसून येत नाही.  

पुण्यात कीटकनाशक फवारणीचा अभाव
पुणे महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एखादा डेंगी, हिवताप अथवा चिकुनगुनियाचा किंवा झिकाचा रुग्ण आढळल्यास अडीच चौरस किलोमीटर परिसरात एक पर्यवेक्षक आणि दोन कर्मचारी आवश्यक आहे. मात्र पुरेसे मनुष्यबळ आणि पायाभूत सोईसुविधांच्या अभावामुळे कीटकनाशक आणि अळीनाशक फवारणी केली जात नाही.

पुणे महापालिकेच्या हद्दीत सरकारी रुग्णालयात डेंगीचे २०२ तर खाजगी रुग्णालयात २,५७७ अशी २,७७९ रुग्णांची नोंद आहे.  सरकारी रुग्णालयात चिकुनगुनियाच्या १७६ रुग्णांची नोंद आहे. खासगी रुग्णालयातील आकडेवारी अद्याप संकलित केली गेली नाही.
- डाॅ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, पुणे  महापालिका आरोग्य विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest