संग्रहित छायाचित्र
लोणी काळभोर : पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील लोणी काळभोर पोलीस (Loni Kalbhor Police) ठाण्यातील चौघा पोलिसांना बिनधनी व विविध गुन्हातील दुचाकी परस्पर भंगारवाल्यांना विकल्या या कारणांवरून परिमंडळ-५ पोलीस उपायुक्त आर.राजा यांनी चौकशीत दोषी आढळल्याने निलंबित केले आहे. (Pune Police)
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दयानंद दशरथ गायकवाड, पोलीस नाईक संतोष शंकर आंदुरे, पोलीस शिपाई, तुकाराम सदाशिव पांढरे व राजेश मनोज दराडे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.सोमवारी या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी काढली. (Latest News Pune)
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील उरुळी कांचन पोलीस चौकीचे रुपांतर ग्रामीण पोलीस ठाण्यात झाल्याची घोषणा शासनाकडून झाली. त्यानंतर लोणी काळभोर शहर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कारकूनासह पोलीसांनी विविध गुन्हे किंवा अपघातात जप्त केलेली दहापेक्षा अधिक दुचाकींची खुल्या बाजारात विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला होता. पोलीस कायद्याप्रमाणे पाच अथवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी छोटी अथवा मोठी चोरी केल्यास, संबधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला जातो. या प्रकरणात दोषी पोलिसांवर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सदर प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून सखोल चौकशी सुरु होती. गोपनीय पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार यापुर्वी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत उरुळी कांचन पोलीस चौकी येत असल्याने लोणी काळभोर पोलीसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने उरुळी कांचन चौकीच्या आवारात ठेवली होती. नुकतेच उरुळी कांचन पोलिस चौकीचे रुपांतर नुकतेच ग्रामीण पोलीस ठाण्यात झालेले आहे. एक महिन्यापूर्वी याबाबतची घोषणा पोलीस खात्याकडून झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी उरुळी कांचन पोलीस चौकीच्या आवारातील सर्व वाहने लोणी काळभोर येथील वनखात्याच्या जागेत आणून ठेवण्यासाठी, वरीष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कारकूनासह त्याच्या चार पोलिस सहकाऱ्यांवर कामगिरी सोपवली होती. ही कामगिरी पार पाडताना ज्या दुचाकी वाहनांचा मालक मिळालेला नाही, अशी अनेक वाहने वरील पाच जणांनी परस्पर खुल्या बाजारात विकल्याचे उघडकीस आले.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील उरुळी कांचन पोलीस चौकीत (सध्या उरुळी कांचन ग्रामीण पोलीस ठाणे) येथे जप्त करून लावण्यात आलेली वाहने चोरी प्रकरणी झिरो पोलीस बाळासाहेब रामचंद्र घाडगे यास ताब्यात घेण्यात आले होते. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले, अशी कबुली त्यांने दिली. तसेच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस करणाऱ्याने या आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले. यावेळी जप्त करण्यात आलेली वाहने निलंबित पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने उचलून नेऊन स्क्रॅप केली होती. स्क्रॅप गाड्या घेणारा भंगार व्यवसायिक इम्रान महंमद शेख याने निलंबित पोलिसांना ४ लाख ६० हजार दिले असल्याचे समोर आले आहे.
दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे व राजेश दराडे यांचे वर्तन पोलीस खात्यात अत्यंत गंभीर, बेजबाबदार, अशोभनीय, गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झालेने त्यांचे विरुद्ध निलंबनाची कारवाई कारवाई करण्यात आली आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी उपस्थिती लावली नाही. परिणामी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.