मॅफेड्रॉन, चरस आणि गांजा विकणाऱ्या चौघांना अटक
पुण्यातील वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये पोलीसांनी मेफेड्रॉन, चरस आणि गांजाची विक्री करणाऱ्यांकडून २५ लाख ९४ हजार ८८० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली विरोधी पथक-०२ ने केली आहे.
संकल्प सुरेश सकपाळ (वय ३३, रा. बी. डी. डीचाळ, बिल्डींग नं.११, रूम नं. ५१, वरळी, डॉ. जी.एम भोसले मार्ग, मुंबई), शाहरूख मुस्तफा बेग (वय २१, रा स.नं. १३, गल्ली नं. ५ आंबेडकरनगर, कोंढवा, पुणे), मंटु रामबाबु राय (वय ३३ वर्षे, रा. कौवा चौक, मु.पो. जौरपुर, जिल्हा समस्तीपुर, राज्य, बिहार) आणि राकेशकुमार रामनाथ दास (वय १९, रा. मु. पो. खुसरूपुर, जिल्हा पटना, राज्य, बिहार) अशी अटक कऱण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पुण्यातील एरंडवणे येथील फुटपाथवर उभ्या असलेल्या संकल्प सुरेश सकपाळकडे गांजा असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलीसांनी संकल्पला अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख रुपये किमतीचे ५५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला आहेत. तसेच त्याला अटक करून कलम ८ (क), २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या कारवाईत शाहरुखला पोलीसांनी कोंढवा परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचे मॅफेड्रॉन (एम.डी.) आणि ८१ हजार रूपये किमतीचा चरस जप्त केला आहे. त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात कलम ८ (क),२० (ब),(ii),(अ), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिसऱ्या कारवाईत मंटु आणि राकेशकुमारला बंडगार्डन परिसरातून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजार ८८० रुपये किमतीचा ६३ किलो ६९४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्यात कलम ८ (क), २०(ब), (ii), (क), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.