मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूक ठप्प
राज्यातील अनेक जिल्ह्यांसह पुण्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुण्यातील वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पूल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. नदी पुलापासून नविन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
सध्या पुण्यात संततधार पाऊस सुरू आहेत. एकीकडे खड्डे आणि वरून पाऊस त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होऊन परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. याशिवाय मुंबई-बंगळुरू महामार्गाला जोडणाऱ्या वारजे परिसरातील रस्त्यांवरही प्रचंड कोंडी झाली आहे. यामुळे वाहन चालक, नागरिक, कामगार, विद्यार्थी हैराण झाले आहेत. वडगाव, धायरी, नऱ्हे, आंबेगाव परिसरातील सर्व सेवा रस्ते वाहतुक कोंडी मुळे ठप्प झाले आहेत.
याबाबत माहिती देताना सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे म्हणाले की, “महापालिकेने मुठा नदीजवळील रस्त्यावर पडलेले खड्डे सिमेंट टाकून बुजवले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे सिमेंट वाहून गेल्याने संपूर्ण रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. तेव्हापासून परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. आज वडगाव बुद्रुक ते मुठा नदीपर्यंतची संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याने परिस्थिती जास्तच बिकट झाली आहे. तथापि, मी आणि माझ्या टीमकडून याबाबत पुर्ण प्रयत्न सुरू आहेत.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.