भाजपची लोकसभेसाठी तयारी
पुणे: लोकसभा निवडणुकीच्या तयारी भारतीय जनता पक्षाने (BJP) सुरवात केली आहे. भाजपकडून ४ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान बूथ चलो अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी सोमवारी (दि.२९) पत्रकार परिषदेत दिली. सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर,महेश पुंडे, संजय मयेकर,पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी यावेळी उपस्थित होते. (Latest News Pune)
भाजपकडून पुणे लोकसभा मतदार संघातील दोन हजार दहा बूथवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सुचनेनुसार प्रत्येक बूथसाठी एक प्रवासी कार्यकर्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. निवडणुकीपर्यंत दर पंधरा दिवसांनी हा कार्यकर्ता बूथवर भेट देणार आहे. असे घाटे यांनी यावेळी सांगितले.
पुणे जिल्ह्यात पुणे शहर, मावळ, बारामती, शिरुर असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. ग्रामीण भागात लोकसभा निवडणुकीसाठी ‘गाव चलो अभियान’ राबविले जाणार आहे. तर शहरी भागात बुथ चलो अभियान राबविले जाणार आहे. या अभियानासाठी समिती तयार केली आहे. यात पक्षाचे सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार , नगरसेवकही सहभागी होणार आहेत. या बुथ अभियानात दुसऱ्या बुथ मधील कार्यकर्ता, पदाधिकारी हा दुसऱ्या बुथ मध्ये जाऊन पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार आहे. तसेच ‘पन्ना यादी’ ( मतदार यादी ) तयार केली जाणार आहे. संबंधित बुथ अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. शहरात २ हजार १० बुथ असुन, या प्रत्येक बुथवर दुसऱ्या बुथवरील कार्यकर्ते लक्ष देणार आहे. हे काम तात्पुरत्या स्वरुपाचे असुन, कोणत्याही प्रकारची पडताळणी करण्याचा हेतू यामागे नाही’’ असेही घाटे यांनी स्पष्ट केले. तसेच पुणे लोकसभेची बूथ समितीची रचना पूर्ण झाली असून २०१० बूथ प्रमुख, ७३१ सुपर वॉरियर्स, ४७२ शक्ती केंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र शासनाच्या योजना मतदारांपर्यंत पोहोचविणार...
- केंद्र शासन आणि राज्य सरकारची विकासकामे आणि योजना या अभियानाअंतर्गत मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
- शहर सरचिटणीस रवी साळेगावकर आणि सुभाष जंगले यांची या अभियानाच्या संयोजक म्हणून नियक्ती करण्यात आली आहे.
संयोजकांकडून ही होणार कामे...
बूथ समितीची बैठक घेणे, बूथ समिती आणि पन्ना प्रमुख यांना त्यांच्यावरील जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन मतदार नोफ्लदणी, मतदार यादीचा आढावा, व्हॉटसॲप ग्रुप तयार करणे, विकसित भारतसाठी ब्रँड ॲबँसिडर बनविणे, प्रचार मोहिमेचा आढावा घेणे, प्रत्येक बूथवर ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविण्याचे नियोजन करणे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे, प्रभावशाली व्यक्तिंची भेट घेणे, लाभार्थ्यांशी संवाद साधणे, विविध समाज घटकांच्या बैठका घेणे अशाप्रकारची कामे या अभियानातून करण्यात येणार आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.