भीमाशंकर-कल्याण एसटी बस उलटली, पाच जण जखमी
भीमाशंकर-कल्याण एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे जिल्ह्यातील गिरवली गावाजवळ झाला आहे. अपघातातील जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकर-कल्याण एसटी बस MH 14 BT 1582 ही गिरवली गावाजवळ सकाळच्या सुमारास पलटी झाली. सुमारे ८ फुट खड्ड्यात ही बस पलटी झाली आहे. या बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत.
अपघात होताच १०८ नियंत्रण कक्षाला दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पाच रुग्णवाहिका अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. बसला झालेल्या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.