गेल्या २४ तासात लोणावळ्यात २१० मिमी पावासाची नोंद
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे आणि जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात लोणावळा येथे २१०.५ मिमी पावसाची नोंद झाली, तर लवासामध्ये १११.५ मिमी पावसाची नोंद झाली.
घाटातील धोकादायक झोनमध्ये प्रवास टाळावा. तसेच पुणे-मुंबई प्रवासादरम्यान घाटातून जाताना वाहन चालवताना खबरदारी घ्यावी, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. आयएमडीच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासात मुळशीमध्ये ५६.५ मिमी तर जुन्नरमध्ये ३७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर शिरगावमध्ये १६० मिमी, ताम्हिणी घाटमध्ये २१० मिमी, खोपोलीमध्ये २१५ मिमी, धारावी ११८ मिमी, अंबोनेमध्ये १६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुणे शहरात पुढील तीन ते चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरात मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. यामुळे रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसात लगतच्या घाट भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण घाट भागात अतिमुसळधार पावसासोबतच सोसाट्याचे वारे ३० ते ३५ किमी प्रति तासाने वाहतील. यामुळे झाडे देखील उन्मळून पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.