संग्रहित छायाचित्र
आरोग्य विभागाची प्रशासकीय अनास्था, रस्त्यांच्या दुरवस्थेने राजगड तालुक्यातील एका तरुणाचा बळी घेतला आहे. दम्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात हलवण्यात आलेल्या या तरुणाला खराब रस्त्यामुळे १५ किलोमीटर अंतरासाठी दीड तास लागला. त्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने या तरुणाला प्राण गमवावे लागले. आपल्या नजरेसमोर आपल्या तरुण मुलाचे प्राण जाताना पाहण्याची वेळ पालकांवर आली. या तरुणाच्या आई-वडिलांनी या प्रशासकीय बेदरकारीविरोधात संताप व्यक्त केला आहे.
संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संदेश याला लहानपणापासून दम्याचा त्रास होता. घटना घडली त्यादिवशी देखील त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी गावामध्ये सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्याला सोंडे सरपले येथील उपकेंद्रावर नेण्यात आले. मात्र, हे केंद्र बंद होते. त्यामुळे त्याला घेऊन कुटुंबीय गावापासून नसरापूरकडे नेले जात होते. अंबवणेमार्गे जात असताना हा रस्ता खराब होता. हे सर्वजण कोदवडीमार्गे नसरापूरच्या दिशेने जात होते.
रस्ता खराब असल्याने गाडी सावकाश चालवावी लागत होती. त्यातच गुंजवणी नदीवरील कोदवडी येथील अरुंद पुलावर हार्वेस्टर मशिन अडकलेली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली होती. याठिकाणी त्यांचा जवळपास अर्धा तास वाया गेला.
करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर योग्य उपचार मिळत नसल्यामुळे त्या ठिकाणी न थांबता त्याला नसरापूरकडे नेले जात होते. याच कालावधीत संदेशला अधिक त्रास जाणवू लागला. मात्र, नसरापूरकडे जाण्यासाठी बनेश्वर फाट्यापासून मोठी गर्दी झालेली होती. याठिकाणी देखील वाहतूक कोंडी झालेली होती. त्यामुळे दवाखान्यापर्यंत जाण्यासाठी गावापासून दीड तास लागला. मात्र, रुग्णालयात पोचण्यापूर्वीच संदेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.