परवानगी नसलेल्या मिरवणुकीत पोलीस अधिकारी!
लक्ष्मण मोरे
बार्सिलोना येथे झालेल्या 'आयर्न मॅन'(Iron Man) स्पर्धेतील विजेत्या खेळाडूच्या सन्मानार्थ काढण्यात आलेली रॅली (Rally)वादात सापडली आहे. नांदेड सिटीमध्ये (Nanded City)काढण्यात आलेली ही रॅली पोलिसांची(Police) आणि सोसायटीची परवानगी न घेता काढण्यात आली आणि त्यामध्ये पोलीस अधिकारी सहभागी झाले (Pune Police )होते, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
ही घटना रविवारी (दि. ८) घडली. या प्रकरणी रहिवाशांकडून पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयासह पोलीस नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली आहे. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे हे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्याही नावाचा उल्लेख या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. ताम्हाणे यांनी मात्र आपण केवळ स्वागत करण्यासाठी उपस्थित होतो. रॅली काढण्याशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. हवेली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन वांगडे यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याचे सांगितले.
नांदेड सिटीमधील रहिवासी आणि व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या स्मित पाठक यांनी याबाबत ईमेलद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार, सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी टाउनशिपमध्ये 'आयर्न मॅन बार्सिलोना' असे पदक जिंकलेल्या काही खेळाडूंच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सोसायटीमधून रॅली काढण्यात आली होती. पाठक यांनी ही रॅली अनधिकृत आणि बेकायदेशीर होती, असा दावा तक्रारीमध्ये केला आहे. साधारणपणे ही रॅली रविवारी (दि. ८) संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास सुरू झाली. त्यांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळावर आलेले बीट मार्शल, ड्यूटीवरील पोलीसदेखील रॅली थांबवू शकले नाहीत. हे बीट मार्शल निघून गेल्यानंतर दुसरे बीट मार्शल तेथे आले. त्यांच्या चौकशीत या रॅलीला परवानगी नसल्याचे समोर आले. मात्र, त्यांनीही कारवाई केली नाही. ही रॅली रात्री नऊपर्यंत सुरू होती. पोलीस निरीक्षकानेच ही रॅली आयोजित केली होती किंवा ते रॅलीचा भाग होते, असा दावाही तक्रारदार स्मित पाठक यांनी केला आहे.
रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मुंढवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांना हवेली पोलीस निरीक्षकांनी विनंती करूनही ही रॅली थांबविण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे स्वत: पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी लक्ष घालून दोषी आढळल्यास कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारी मिरवणूक, परिसराची शांतता, फटाके फोडणे, केवळ पोलिसांच्या प्रभावामुळे वाहतूक वळवणे या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाठक यांनी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे, अनधिकृत रॅली, इत्यादी संबंधित कायदे मोडले गेले असून त्यांचे सर्व संबंधित व्हीडीओ उपलब्ध असल्याचेही त्यांनी ईमेलद्वारे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, या स्पर्धेत सहभागी झालेले काही स्पर्धक नांदेड सिटीमध्ये राहात असल्याचे पाठक यांनी सांगितले. त्यामुळे सोसायटीमधून ही रॅली काढण्यात आली होती. रॅलीमध्ये ढोल ताशे वाजविण्यात येत होते. त्यामुळे आवाज मोठ्या प्रमाणावर होत होता.
बार्सिलोना येथे झालेल्या 'आयर्न मॅन' स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंच्या स्वागतासाठी मला आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी गेलो होतो. त्या रॅलीला परवानगी होती किंवा नव्हती, याबाबत मला सांगता येणार नाही. परवानगी घेणे हे आयोजकांचे काम आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे कौतुक करणे गैर नाही. मी खेळाडूंचे स्वागत करून लगेच परत आलो.
- विष्णू ताम्हाणे, वरिष्ठ निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे
सोसायटीमधील काही सदस्यांनी 'आयर्न मॅन' स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी मागणारे पत्र दिले होते. सोसायटी सदस्यांनीच अर्ज केलेला असल्याने त्यामध्ये विशेष आक्षेप घेण्यासारखे काही नव्हते. सोसायटीत असे अनेक कार्यक्रम होत असतात. हा कार्यक्रमदेखील अंतर्गत झालेला होता. रॅलीदेखील सोसायटीच्या आवारातच झाली होती. पोलिसांच्या परवानगीबाबत आम्हाला खात्रीलायक सांगता येणार नाही.
- मनोज शर्मा, सुरक्षाप्रमुख, नांदेड सिटी
नांदेड सिटीमधील रहिवाशांकडून ईमेलद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे 'आयर्न मॅन' स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंच्या सन्मानार्थ रॅली काढण्यात आल्याप्रकरणी तक्रार केलेली आहे. ही रॅली बेकायदा होती, असा त्यांचा आक्षेप आहे. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करून त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. या रॅलीमध्ये पोलीस अधिकारी होते, असेही तक्रारीत नमूद आहे. चौकशीत जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे अहवाल सादर केला जाईल.
- सचिन वांगडे, वरिष्ठ निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.