Traffic News : पीएमपी, एसटी रडारवर; नियम मोडणाऱ्यांना बसणार चाप

कधी झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहून तर कधी सिग्नल तोडून केला जाणारा नियभंग... धूर ओकत जाणाऱ्या आणि रस्त्यातच बंद पडणाऱ्या नादुरुस्त बसेस... यामुळे होणारी वाहतूक कोंडी... 'पीएमपीएमएल' बसेसमुळे निर्माण होणारे हे चित्र शहरात नवीन राहिलेले नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sun, 8 Oct 2023
  • 12:00 pm
Traffic News

पीएमपी, एसटी रडारवर

वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवित दंडात्मक कारवाईला सुरुवात

लक्ष्मण मोरे

कधी झेब्रा क्रॉसिंगवर (Zebra Crossing) उभे राहून तर कधी सिग्नल तोडून केला जाणारा नियभंग... धूर ओकत जाणाऱ्या आणि रस्त्यातच बंद पडणाऱ्या नादुरुस्त बसेस... यामुळे होणारी वाहतूक कोंडी... 'पीएमपीएमएल' (PMPML)बसेसमुळे निर्माण होणारे हे चित्र शहरात नवीन राहिलेले नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांची(Traffic Police) मात्र रोजची डोकेदुखी वाढत आहे. पीएमपी बसचालकांच्या या मनमानीपणाला आता चाप लावला जाणार आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी (Pune City Traffic Police) आता थेट पीएमपी आणि एसटी (ST Bus) महामंडळाच्या बसेसवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील बनत चालली आहे. वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, चुकलेले इन्फ्रास्ट्रक्चर, शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक यामुळे कोंडीत दररोज भर पडते. यामुळे शहरातील रस्त्यांचा श्वास गुदमरत आहे. त्यातच वर्दळीच्या आणि गर्दीच्या रस्त्यांवर पीएमपी बस बंद पडण्याचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. अशा बंद पडलेल्या पीएमपी बस वाहतूक कोंडीत मोठी भर  घालत असतात. दररोज किमान दहा बस गर्दीच्या रस्त्यांवर बंद पडत आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत शहराच्या वेगवेगळ्या भागांत ५ हजार ७८३ वेळा पीएमपी बस बंद पडल्या आहेत. वाहतूक कोंडीला पीएमपी बसही तितक्याच जबाबदार असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. नादुरुस्त बस रस्त्यावर धावत असल्याने त्या वारंवार बंद पडतात. या बस लवकर रस्त्यावरून हटविल्या जात नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

पीएमपीएमएलकडून पुणे, पिंपरी-चिंचवड या महापालिकांसह ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या (पीएमआरडीए) हद्दीमध्ये बस सेवा पुरविली जाते. सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम असायला हवी, असे कायम म्हटले जाते. मात्र, शहरातील चित्र अद्याप बदललेले नाही. बंद पडणाऱ्या पीएमपी बसमुळे वाहतूक कोंडीत दिवसागणिक भर पडत आहे. पावसाळ्यामध्ये पीएमपी बस बंद पडण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते. पीएमपीने नादुरुस्त बस रस्त्यावर आणू नये, असे वाहतूक पोलिसांनी अनेकदा कळवूनदेखील त्याची अंमलबजावणी केली जाता नाही. गेल्या काही महिन्यांत पीएमपी बस बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एक आठवडाभर ही मोहीम चालविली जाणार असून या वाहनांवर दंड आकारणी सुरू झाली आहे.

 पीएमपी आणि एसटी बसचालक बेदरकारपणे बस चालवतात. अनेकदा या बस सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या केल्या जातात. झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या अन्य वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु, सरकारी वाहन म्हणून पीएमपी तसेच एसटी बसकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा सिग्नल लागलेला असतानाही पीएमपी बसचालक तशीच बस पुढे दामटतात. सिग्नल तोडणे हा तर नित्यक्रम बनला आहे. बस थांब्यावरदेखील या बस व्यवस्थित उभ्या केल्या जात नाहीत. वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे बस उभ्या केल्या जातात. एकामागे एक अशा दोन-तीन बस लागल्या की मागील अन्य वाहनांना पुढे जाता येत नाही. त्याची परिणतीदेखील वाहतूक कोंडी वाढण्यात होते. अशा एक ना अनेक कारणांमुळे शेवटी वाहतूक पोलिसांनी पीएमपी आणि एसटी बसेसवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बेशिस्त चालकांना शिस्त लावण्यासाठी हे पाऊल टाकल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  

एसटी आणि पीएमपी बसेसचे चालक अनेकदा वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. मूळ रस्ता सोडून वाहने उभी करतात. अचानक ब्रेक दाबून थांबतात. त्यांच्या ब्रेकचे आवाज कर्णकर्कश असतात. त्यामुळे अनेकदा अपघातदेखील होतात. धोकादायक पद्धतीने गाडी चालविणे, सिग्नल न पाळणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणे नित्याचे झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई आवश्यक आहे. जो नियम सर्वसामान्य वाहनचालकांना तोच नियम या बसचालकांना देखील लागू आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

- विजयकुमार मगर, उपायुक्त, पुणे शहर वाहतूक पोलीस  

पीएमपी बसचालकांची मानसिकता सुधारणे आवश्यक

पीएमपी बसचालकांना शिस्त लागावी. त्यांनी वाहतुकीचे नियम पाळावेत याकरिता काही महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी त्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता. या प्रशिक्षण वर्गात बस नेमकी कशी उभी करावी, इथपासून ते वेग मर्यादा, अपघात रोखणे आदी विषयांवर वाहतूक अधिकाऱ्यांनी पीएमपी बसचालकांना मार्गदर्शन केले होते. बसचालकांची मानसिकता सुधारण्याची आवश्यकता आहे. दंड झालाच तर तो सरकारी वाहनांवर होणार आहे. त्यामुळे आपल्याला त्यांची तोशिश पडणार नाही असे त्यांना वाटते. त्यांच्यावरदेखील कारवाईची तरतूद असायला हवी, अशी मागणी केली जात आहे. ती लक्षात घेऊन पीएमपी बसचालकांनादेखील दंड केला जाण्याची शक्यता आहे.

एसटी बसच्या नियमभंगाला लागणार ब्रेक

एसटी महामंडळाच्या बसदेखील अनेकदा शहारातील सिग्नल पाळत नाहीत. वेळेत पोचण्याच्या नादात सिग्नल तोडले जातात. झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे ही तर एसटी बस चालकांची खासियत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. एसटी महामंडळाच्या चालकांविरुद्धदेखील वाहतूक नियमभंगाच्या अनेक तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे यापुढे एसटी चालकांवरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

 यंदा जून ते ऑगस्टदरम्यान ५,७८३ बस पडल्या बंद 
 दररोज सरासरी ६४ बस पडतात बंद (ब्रेक डाऊन)
 गर्दीच्या मार्गावर बस बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर  
  वाहतूक पोलिसांची कोंडी सोडविताना दमछाक
  बंद पडलेली बस हलविण्यात वेळकाढूपणा
  ठेकेदारांकडील चालकांची बेदरकार वृत्ती 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest