संग्रहित छायाचित्र
पुणे : पुढच्या दाराने नको मागच्या दाराने या...पालिकेचे सरपंच आले...पालिकेचे मोठे साहेब आले...चला पास दाखवा... अशा शब्दात थट्टा करुन मोठ-मोठ्याने चालक आणि वाहक हसतात. अशा प्रकारे माझी थट्टा केली जाते. तक्रार केली म्हणून सेल्फी काढून चालकांच्या ग्रुपवर शेअर केला. पिवळी पाटी विनंती थांब्यावर बस कधी मागे तर कधी पुढे उभी केली जाते. हे सर्व मुद्दाम केले जात आहे, त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. अशी खंत ७६ वर्षीय प्रवासी सतीश मेहता यांनी सीविक मिररला सांगितली.
पीएमपी पुणेकरांची जीवनवाहिनी बनली आहे. पीएमपीकडून प्रवाशांना चांगल्या दर्जाची सुविधा दिली जात असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या २० ते २५ वर्षांपासून सातत्याने पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. याचे कारण केवळ पीएमपीकडून दिली जाणारी चांगली सेवा. मात्र काही वेळी काही चालकांच्या उध्दट वागण्यामुळे ज्येष्ठच नव्हे तर नवख्या प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागतो. अनेकवेळा पीएमपी बस थांब्यावर न थांबवणे, एकच प्रवासी उभा आहे, आणि कोणी प्रवासी बसमधून संबंधित थांब्यावर उतरणारा नसल्यास बस न थांबवता वेगाने पुढे जाणे. असे प्रकार चालकांकडून होत असल्याने बसने प्रवास करता येत नाही. त्यामुळे रिक्षाने किंवा खासगी वाहनाने जावे लागते. असे राकेश भोसले या प्रवाशाने सांगितले.
पीएमपीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये नोकरदार वर्गासह मध्यमवर्गीय प्रवाशांचे प्रमाण अधिक आहे. विद्यार्थी, कामगार, नोकरदार यांच्यासह सर्वच क्षेत्रातील आणि स्तरातील प्रवाशांची पीएमपीने प्रवास करण्यासाठी गर्दी होत असते. त्यामुळे एकाच मार्गावरुन दररोज प्रवास करणारे देखील ठरावीक प्रवासी आहेत. तसेच त्याच मार्गावरील बस आणि बसचे चालक, वाहक अनेकवेळा तेच असतात. त्यामुळे प्रवासी आणि त्यांची चांगली ओळख होते. यातील कोणी प्रवाशाने पीएमपी प्रशासनाकडे तक्रार केली तर त्याला जाणिवपूर्वक त्रास दिला जातो. अशा तक्रारी देखील पीएमपीला प्रवाशांकडून केल्या जातात. मात्र कोणतीही कारावाई केली जात नाही. त्यामुळे चालकांमध्ये अद्याप पर्यंत कोणताही फरक पडलेला नाही. असे ज्येष्ठ प्रवासी मोहनराव साळुंखे यांनी सांगितले.
विनंती थांबा लावण्याचा पीएमपीला विसर...
शहरातील रस्त्यांवर सर्वसामान्यपणे बस थांबे उभारण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी रस्ते अरुंद असणे, पुरेशी जागा न मिळणे आदी कारणांमुळे बस थांबे उभारले जात नाहीत. अशा वेळी पीएमपीकडून पिवळ्या रंगाचे बस थांबे लावण्यात येतात. हा थांब बघून पीएमपी बस थांबवली जाते. या थांब्याची केवळ पाटी असल्याने प्रवासी त्या पाटीच्या समोरच उभे राहतात. बस चालक रस्त्यावरील वाहतूकीच अंदाज घेवून त्यापाटीच्या कधी मागे तर पुढे थांबवतो. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये बसण्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे नेमके कोठे थांबावे हे प्रवाशांना समजत नाही. तसेच काही ठिकाणी बस थांबते पण तिथे कोणत्याही प्रकारची थांबा असल्याची पाटी लावण्यात आलेली नाही. एक दोन प्रवासी थांबलेले असतात. ते बघून इतर प्रवासी थांबतात. अधिकृत थांबा असताना अशा विनंती थांब्याची पाटी लावण्याचा पीएमपीला विसरा पडला आहे का असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. प्रवाशांची अडचण समजून घेत पीएमपी प्रशासानाने पिवळ्या पाटीचे थांबे लावावेत. अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे.
१ हजारहून अधिक वेळा केली तक्रार
पीएमपी बस वेळेत न येणे, चालकांची बेशिस्त, पास बाबत तक्रारी, बस योग्य ठिकाणी न थांबवणे, ज्येष्ठ प्रवाशांना जाणीवपूर्वक त्रास देणे आदी प्रकारच्या १ हजारहून अधिक तक्रारी पीएमपी प्रशासनाकडे वेगवेगळ्या माध्यमातून केल्या आहेत. मात्र कोणताही फरक पडलेला नाही. अनेक वेळा पीएमपी प्रशासन तक्रारींची दखलही घेत नाही. अशा वेळी प्रवाशांनी काय करावे, असा प्रश्न सतीश मेहता यांनी उपस्थित केला आहे.
प्रत्येक थांब्यावर बस थांबवलीच पाहिजे. ज्या प्रवाशांना असे अनुभव आले असतील त्यांनी थेट माझ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून कारवाई करावी. लेखी तक्रार करताना त्यामध्ये कोणत्या बस मार्गावर असा प्रकार घडत आहे, याची सविस्तर माहिती द्यावी.
- नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक
पीएमपी प्रशासनाकडून विनंती थांब्याची माहिती घेतली जात आहे. प्रवाशांना त्रास देण्याचा कोणताही हेतू नाही. प्रवाशांच्या सेवेसाठीच चालक वाहक काम करतात. लेखी तक्रार आल्यास प्रशासनाकडून कारवाई केली जाते.
- सतीश घाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपी.
ज्येष्ठ प्रवाशांना बसमध्ये सन्मानाने प्रवेश दिला जातो. प्रवासी बसमध्ये चढला असल्याची खात्री केली जाते. त्यानंतरच बस मार्गस्थ होते. विनंती थांब्याची पाटी असलेल्या थांब्यावर बस थांबवताना काही वेळा पुढे मागे होते. रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा अडथळा येतो. कोणत्याही प्रवाशांना ठरवून त्रास देण्याचा प्रश्नच येत नाही.
- एक चालक