संग्रहित छायाचित्र
पुणे: पाणी मीटर बसविण्यासाठी नागरिकांचा विरोध होत असल्याने सुरक्षा रक्षकांची मदत घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने सुरक्षा विभागाला सुरक्षा रक्षक देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकांच्या आर्थिक तरतुदीसह आयुक्तांची परवानगी घेण्याचा सल्ला दिला आहे. (Pune News)
त्यामुळे पाणी मीटर बसविण्याचे काम लांबणीवर पडणार आहे. समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नळ जोडणी दिली जात आहे. त्यानंतर पाणी मीटर बसविण्यात येत आहेत. पाणी कमी दाबाने येणे, महिन्याला पैसे भरावे लागतील याची भीती तसेच पाणी वापरावरील नियंत्रणामुळे पाणी मीटर बसविण्यासाठी नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे पालिकेपुढे पाणी मीटर बसविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यावर आयुक्तांनी सुरक्षारक्षकांची मदत घेण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले होते. सुरक्षा रक्षक मिळाल्यानंतरच पाणी मीटर बसविण्याचे काम सुरु केले जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले होते. आता सुरक्षा रक्षकांना वेतन देण्यासाठी बजेटच सुरक्षा विभागाकडे नाही. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाला पु्न्हा नव्याने प्रस्ताव तयार करुन सुरक्षा रक्षकांची संख्या आणि वेतनापोटी लागणारा खर्च याला स्थायी समितीची मान्यता घ्यावा लागणार आहे. त्यानंतर आयुक्तांचीही परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षक पाणी मार्ग मोकळा होणार असल्याचे सुरक्षा विभागाने ‘सीविक मिरर’ला सांगितले. पाणी मीटर बसविण्यास नागरिकांचा विरोध होत असल्याने दिवसाला केवळ ४० ते ५० मीटरच बसविले जात आहेत. (Pune Municipal Corporation)
दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण करण्यासाठी पालिकेकडून गेल्या काही महिन्यांत दिवसाला ४०० ते ५०० मीटर बसविण्यासाठी नियोजन करण्यात आले होते, त्यासाठी १० पथकेही नेमली होती. मात्र पालिकेस अद्यापही शहरात तब्बल १ लाख ४८ हजार मीटर बसविणे बाकी आहे.
५० सुरक्षा रक्षकांची मागणी
पाणी पुरवठा विभागाने मीटर बसविण्यासाठी एकूण ५० सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे. सुरक्षा विभागाकडेच मनुष्यबळ कमी असल्याने आहे सध्या पाणी पुरवठा विभागाला सुरक्षा रक्षक देता येणे शक्य नाही. नव्याने द्यायचे झाले तर त्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे नव्याने प्रस्ताव सादर करावा लागणार असून त्याला मान्यता मिळण्यासाठी साधारणपणे महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे पाणी मीटर जोडणीच्या प्रत्यक्षा कामाला पुन्हा कधी सुरवात होणार हा प्रश्नच आहे.
आयुक्तांनी घेतला होता आढावा
समान पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा वेळोवेळी आढावा आयुक्तांकडून घेण्यात येतो. त्याप्रमाणे याचा आढावा गेल्या आठवड्यात पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला. या बैठकीत मीटर बसविण्याचे काम संथ गतीने सुरू असल्याची माहिती समोर आल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच मीटर बसविण्यास नागरिकांकडून विरोध असल्याचे सांगण्यात आल्यानंतर पोलिसांची मदत घेण्याच्याही सूचना केल्या होत्या. मात्र, पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केल्यानंतर पालिकेने नेमलेल्या पोलिसांचा दर्जा असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १० कर्मचारी सोबत घेऊन ही कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या.
अडीच हजार कोटींची समान पाणी पुरवठा योजना
पालिकेकडून समान पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल २५०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. योजनेनुसार पालिकेकडून शहरात २ लाख ८६ हजार पाण्याचे मीटर बसविण्यात येणार आहेत. हे मीटर स्वतंत्र मिळकती तसेच सोसायट्यांच्या नळजोडांना बसविण्यात येत आहेत. हे काम सुरू झाल्यापासून पालिकेने शहरात १ लाख ४५ हजार पाण्याचे मीटर बसविले आहेत. कधी मीटर नसल्याने, कधी मीटर बसविण्यास विरोध होत असल्याने तर कधी आवश्यक मनुष्यबळ नसल्याने हे काम रखडले आहे.
पाणी पुरवठा विभागाने ५० सुरक्षा रक्षकांची मागणी केली आहे. आर्थिक तरतूद नसल्याने सुरक्षा रक्षक देता येणार नाही. आर्थिक तरतूद करुन विभागाने पुन्हा प्रस्ताव द्यावा. त्यानंतरच सुरक्षा देता येणे शक्य होणार आहे.
- राकेश विटकर, सुरक्षा रक्षक विभाग प्रमुख, महापालिका.