आमदार धंगेकरांच्या वर्तणूकीचा पालिकेच्या अभियंत्यांकडून निषेध
पुणे : कॉँग्रेसचे कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावेळी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांना शिवीगाळ केली होती. या घटनेचा महापालिकेच्या अभियंता संघाने निषेध केला. महापालिकेच्या हिरवळीव जमलेल्या सर्व अभियंत्यांनी घडलेला प्रकार दुर्दैवी आणि निंदनीय असल्याची टीका यावेळी केली. महापालिकेमधील अधिकाऱ्यांची सुरक्षा आणि सन्मान राखला जायला हवा अशी अपेक्षा देखील या आंदोलनावेळी व्यक्त करण्यात आली. (Latest News Pune)
या आंदोलनाला शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर, प्रकल्प विभाग प्रमुख श्रीनिवास बोनाला, बांधकाम विभागाचे कार्यकारी अधीक्षक युवराज देशमुख, अभियंता सुनील कदम, संजय पोळ, केदार साठे, मुकुंद बर्वे आदी उपस्थित होते.
जगताप यांना मिळालेल्या वर्तणूकीच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी महापालिकेत आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी पुढील दिशा देखील ठरवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करीत घडलेल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करीत असताना अशा प्रकारे त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे, शिवीगाळ करणे निंदनीय असल्याचा सूर सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बोलण्यात होता. मागील काही वर्षात अशा घटना वाढत चालल्या असून याविषयी कार्यपद्धती निश्चित केली जाण्याची आवश्यकता देखील व्यक्त करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.