पुणेकरांची देशभक्ती, सिमेवरील सैनिकांकरीता हजारो राख्यांचे आयोजन
भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. परंतु देशाच्या सिमेचे रक्षण करणा-या सैनिकांचे मात्र कोणाशीही रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. सरहद्दीवरील अशा हजारो सैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी हजारो राख्या सिमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला. विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एकत्रित केलेल्या राख्यांचे पूजन पुणेकरांनी भारत मातेच्या जयघोषात झाले.
सैनिक मित्र परिवारातर्फे कसबा पेठेतील तांबट हौद चौकातील महाकालिका मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात एव्हरेस्टवीर सुविधा कडलग यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे विपीन शेठ, स्वाती पंडित, वृषाली पटवर्धन, श्वेता पोटफोडे, चेतन धोत्रे, नंदा पंडीत, स्वप्नील नहार आदी उपस्थित होते. सैनिकांसाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र, पत्र व राख्या पाठविण्यात आल्या. एव्हरेस्ट मोहिमेच्या आठवणी व प्रवास सुविधा कडलग यांनी उपस्थितांसमोर उलगडला.
सुविधा कडलग म्हणाल्या, मला देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. मी लष्करात नाही, मात्र मी भारताचा ध्वज अशा ठिकाणी फडकविन की सगळ्यांना अभिमान वाटेल. त्यामुळे एव्हरेस्ट मोहिम केली. महाराष्ट्राची संस्कृती पोहोचविण्याकरिता मी नऊवारी साडी घालून तेथे विक्रम केला. कुटुंबाची जबाबदारी आणि घर सांभाळून या मोहिमा मी पूर्ण केल्या आहेत. आपल्या लष्करी जवानांचे कार्य मोलाचे आहे. त्यांना आपण सलाम करायला हवा.
आनंद सराफ म्हणाले, भारतीय सण हे नाती दृढ करणारे सण आहेत. गेल्या काही वर्षांपासून या सणांना सामाजिकतेची जोड मिळत आहे. समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करुन देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, याकरीता १९९८ पासून हा सातत्याने राबविण्यात येत आहे. देशाच्या विविध सिमाभागांत प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या पाठविल्यानंतर तेथे पूजन करुन सैनिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अनेकदा सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून पत्र आणि भेटवस्तू देखील पुणेकरांना पाठविल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.
दीपिका वडके, अमिता निजामपूरकर यांनी उपक्रमाला सहकार्य केले. तर, गिरीश पोटफोडे, राजश्री शेठ, सारंग सराफ यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. अमिता निजामपूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.