पथनाट्यासाठी आलेल्यांचा रस्त्यावरच 'हाय ड्रामा
पथनाट्यासाठी आलेल्यांचा रस्त्यावरच 'हाय ड्रामा
आरोग्य विभागामार्फत कचरा व्यवस्थापनाच्या पथनाट्यासाठी आलेल्या दोन ग्रुपमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यामुळे पथनाट्याऐवजी चहा पिताना झालेल्या वादातून मुद्यावरून गुद्दयावर आलेल्या कलाकारांचे भलतेच नाटक पिपरी चिंचवडवासियांना बघायला मिळाले..
या घटनेत देवानंद बाळासाहेब शिंदे (वय ३१. रा. धायरी, पुणे) जखमी झाले असून त्यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेश मिजार आणि अनिकेत राजेशिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवडमध्ये मंगळवारी (३१ जानेवारी) सकाळी हा प्रकार घडला.
शिंदे आणि मिजार तसेच राजेशिर्के हे एकाच कंपनीत काम करतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेने जनजागृतीसाठी पथनाट्य करण्याचे काम खासगी संस्थांना कंत्राटी पद्धतीने दिले आहे. या कंपनीत सर्वजण एकत्र काम करतात. चिंचवड येथील भीमनगर येथे मंगळवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास सर्वजण पथनाट्य सादर करण्यासाठी गेले होते.
सर्वजण जवळच असलेल्या चहाच्या दुकानात चहा पीत होते. त्यावेळी पथनाट्य सादर करण्यास उशीर केला. नियोजनास उशीर झाला, अशा किरकोळ कारणांवरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. त्या वादातून मिजार याने शिंदे यांच्या डोक्यात मेगाफोन मारला, तर राजेशिर्के याने लाकडी दांडक्याने मारून शिंदे यांना जखमी केले.
दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आहे. "सर्वजण एकाच कंपनीत कामाला असून, त्यांचे अन्य सहकारी भांडणे झाली तेव्हा तेथेच होते. त्यामुळे वाद जास्त वाढला नाही. संबंधितांच्या वरिष्ठांना याबाबत समज देण्यात आली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे,” अशी माहिती तपास अधिकारी पोलीस अंमलदार समीना मोमीन यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना दिली.