BJP : पार्टी विथ नो डिफरन्स

उठता-बसता ‘ पार्टी विथ अ डिफरन्स’ च्या घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या विचारात आणि कृतीत फरक असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पुणे भेटीसाठी येत असून त्यांच्या स्वागतासाठी जंगली महाराज रस्त्यावर फ्लेक्सचा महापूर आला आहे. यातील बहुतांश फ्लेक्स पदपथावर असल्याने पादचाऱ्यांना माना वाकून चालावे लागत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Mahendra Kolhe
  • Thu, 18 May 2023
  • 11:06 am
पार्टी विथ नो डिफरन्स

पार्टी विथ नो डिफरन्स

महेंद्र कोल्हे/ निखील घोरपडे

feedback@civicmirror.in

TWEET@mahendrakmirror

उठता-बसता ‘ पार्टी विथ अ डिफरन्स’ च्या घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या विचारात आणि कृतीत फरक असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पुणे भेटीसाठी येत असून त्यांच्या स्वागतासाठी जंगली महाराज रस्त्यावर फ्लेक्सचा महापूर आला आहे. यातील बहुतांश फ्लेक्स पदपथावर असल्याने पादचाऱ्यांना माना वाकून चालावे लागत आहे. काही ठिकाणी एवढे मोठे फ्लेक्स आहेत की दुचाकीस्वारांना रस्त्यावरचे आजूबाजूचे व्यवस्थित पाहणे अवघड झाले आहे. काही ठिकाणी फ्लेक्समुळे रस्ते अरुंद झाले आहेत. काही ठिकाणी पदपथावरून चालणे अवघड झालेले आहे. बालगंधर्व रंगमंदिर आणि राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोरील आसपासचा परिसर नड्डा यांच्या स्वागताने असा फ्लेक्समय झाला आहे.   

भाजपाध्यक्ष नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे प्रदेश नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. १८) घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे या कार्यसमितीची बैठक होणार आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित असतील. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत भाजपच्या मंत्र्यांशी नड्डा संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी पाच ते सात या वेळेत आमदार आणि खासदारांशी ते चर्चा करतील.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण भारतातील एकमेव राज्यातील सत्ता भाजपने गमावली आहे. त्यातच भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा करणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला काँग्रेसकडून पराभूत व्हावे लागले होते. या दोन पराभवानंतर नड्डा प्रथमच कर्नाटकचा शेजार असलेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. पुढील वर्षी मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. खासदार गिरीष बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत कोणाला उमेदवारी द्यावी याबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक  राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत होत आहे. ही संधी साधून इच्छुकांनी जंगली महाराज रस्ता परिसर आणि इतर भागात बॅनर उभारण्यास सुरुवात केली आहे. घोले रस्त्यावरील सभास्थानापासून काही पावलांवर असलेला जंगली महाराज रस्ता आणि बालगंधर्व रंगमंदिर परिसरात जोरदार फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे देखील इच्छुक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ‘पार्टी विथ डिफरन्स’ या बिरुदावलीला बगल देत जोरदार फ्लेक्सबाजी केल्याचे दिसून येत आहे. स्वागत कमानीसाठी बालगंधर्व चौकातील रस्ताही अडवण्यात आला आहे. बरेचसे फलक रस्त्याच्या दुतर्फा पदपथावरच उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी फलकांच्या वाढत्या उंचीमुळे पादचाऱ्यांना डोके सांभाळत वाकून जावे लागत आहे. काही ठिकाणी पदपथावर अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.  

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, भाजपची ही संघटनात्मक बैठक आहे. त्यात बाराशेहून अधिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीचा आगामी निवडणुकीशी संबंध नाही. त्यात विकासकामांबाबत चर्चा होईल. मध्यंतरी लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याने पक्षाने फ्लेक्स न लावण्याचे आवाहन केले होते. त्याकाळात माझा वाढदिवस असल्याने मी देखील कार्यकर्त्यांना तेच आवाहन केले होते. मात्र, ही फ्लेक्स बंदी तात्पुरती होती. ती कायमस्वरूपी नव्हती.  

काँग्रेसचे नेते मोहन जोशी म्हणाले की, भाजप दाखवते एक आणि करते दुसरेच. एकीकडे पार्टी विथ डिफरन्ससारखे उपदेशाचे डोस पाजायचे. दुसरीकडे त्याच्या विरुद्ध वर्तन करायचे. फ्लेक्सबाजी  विरोधात उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन करायचे सोडून जंगली महाराज रस्ता आणि परिसर फ्लेक्समय केला आहे. रस्त्यावरच फ्लेक्सचे प्रदर्शन भरवले की काय असे वाटते. भाजपचे असे वागणे पुणेकर कदापी सहन करणार नाहीत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest