संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासह इतर सर्व विभाग मिळून शहरात स्वच्छता अभियान राबवले जात आहे. त्याप्रमाणे शहरातील अनेक ठिकाणे स्वच्छ केली जात आहेत. शहर स्वच्छ होत असताना पालिकेच्याच वडगाव खुर्दमधील मुरलीधर लायगुडे रुग्णालयात भंगार वस्तूंचे साम्राज्य वाढले असून गवत, झाडे-झुडपे वाढल्याने डासांचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे.
केंद्र सरकारतर्फे दरवर्षी देशपातळीवर स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित केली जाते. या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात शहरांची सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छतागृहांची स्थिती, घरोघरी जमा होणारा कचरा, कचऱ्यावर प्रक्रिया आणि नागरिकांचा सहभाग आदींच्या आधारे नामनिर्देशनपत्रे दिली जातात. २०२४ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या नामांकनात वाढ होण्याऐवजी पुणे शहराचे नामांकन नवव्या स्थानावर राहिले आहे. मात्र, पुणे शहराला कचरा निर्मूलनात पंचतारांकित नामांकन मिळाले आहे. गतवर्षी पुणे शहराला थ्री स्टारचे नामांकन मिळाले होते. १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ४५ शहरांमध्ये पुणे महानगरपालिका पहिल्या दहामध्ये नवव्या क्रमांकावर आहे. यंदाही महापालिकेच्या स्वच्छेच्या बाबतीत वरच्या क्रमांकावर येण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
त्यानुसार महापालिकेने शहरात स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र जिथे रुग्णांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो, तिथेच अस्वच्छता असल्याने त्यांच्या बिघडलेले स्वास्थ आणखी धोक्यात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. परंतु नेमकी कोणी जबाबदारी घ्यावी, यावर एकमेकांकडे बोट दाखवण्याचे प्रकार सुरु आहेत. वैद्यकीय कचरा, भंगार वस्तू या या रुग्णालयात साठवल्या जात आहेत. मात्र त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
राजयोग सोसायटीलगतचे महापालिकेचे मुरलीधर लायगुडे रुग्णालय दिड एकर परिसरात आहे. परिसरात रुग्णालय असल्याने हा परिसर स्वच्छ ठेवणे अपेक्षित आहे. परंतु आरोग्य विभागाच्या उदासीन कारभारामुळे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोना काळात या रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट तयार करण्यात आला आहे. या ऑक्सिजण प्लॅंटच्या युनिटमध्येही मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. या युनिटचे २६ डिसेंबर २०२४ रोजी उद्घाटन करण्यात आले आहे. कोरोना काळ संपल्यानंतर ज्या युनिटने लोकांचे जीव वाचवले, आता त्याच युनिटचा श्वास कोंडला जात असल्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील विविध भागात स्वच्छता मोहिम राबवताना आपल्याच दिव्याखाली अंधार आहे, तो आधी दूर करावा, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या स्कॅप धोरणानुसार भंगार मेडिकल वस्तूंची विल्हेवाट लावावी लागते. या धोरणाची प्रक्रिया किचकट आहे. ही प्रक्रिया मेडिकल स्टोअर विभागामार्फत करावी लागणार आहे. या पडलेल्या वस्तू्ंचा बाजार भावाप्रमाणे लिलाव करावा लागतो. त्यासाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. त्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने 'सीविक मिरर'ला सांगितले.
शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या घन कचरा विभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येत असले तरी अद्यापही नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जात आहे. गेल्या वर्षभरात ५२ हजार ४०५ जणांवर कारवाई करुन सुमारे ३ कोटी २८ लाख १८७ रुपये इतका दंड महापालिकेने वसुल केला आहे. पुढील काळात दंडात्मक कारवाईला गती दिली जाणार आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने कचरा जमा होणारे सुमारे ९२३ क्रॉनिक स्पॉट शोधून काढले होते. या क्रॉनिक स्पॉटची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. सुमारे ८० टक्के क्रॉनिक स्पॉट हे कचरामुक्त झाल्याचा दावा घन कचरा विभागाकडून केला जात असला तरी, अद्याप शहरात नवीन क्रॉनिक स्पॉट निर्माण होत आहे. - संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
महापालिकेच्या आरोग्य विभागाला लायगुडे रुग्णालयात पडलेल्या या भंगाराची माहिती देण्यात आली आहे. परंतु हे भंगार उचलण्यासाठी वेळ लागेल असे सांगितले जात आहे. यासोबत परिसरात गवत वाढले असून घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे रुग्णांना आणखी त्रास सहन करावा लागू शकतो. यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करणे आपेक्षित आहे. - रुपेश केसेकर, नागरिक
सूचनाफलकासमोरच कचरा
'स्वच्छ शहर पुणे शहर' अशी ओळख असलेल्या शहरातील नागरिकांना स्वच्छेतेचे महत्त्व कधी समजणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेकडून शहरभर स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. घरोघरी घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा केला जात आहे. तरीही नागरिकांकडून निर्जन ठिकाणी तसेच रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. तो कचरा उचलून येथे कचरा टाकू नये, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देणारे फलक लावण्यात आले आहेत. त्याच फलकांच्या समोर कचरा टाकला जातो. कोंढवा भागातील कौसरबाग रस्त्यावर एका ठिकाणी असाच फलक लावण्यात आला असून कचरा टाकला जात आहे. जनजागृती तसेच वेळोवेळी केलेल्या आवाहनानंतरही नागरिक ऐकत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.