संग्रहित छायाचित्र
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुका होतील याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. महायुती म्हणून पुणे महापालिकेला सामोरे जाण्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसह विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीत मित्र पक्ष म्हणून सहभागी झालेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ला (आरपीआय) पुरेशा जागा दिल्या नव्हत्या. त्यानंतरही आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दोन्ही निवडणुकांत महायुतीचे काम निष्ठेने केले. निवडणुकीपूर्वी आरपीआयला मंत्रिमंडळात स्थान देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, त्यांनी हा शब्द पाळावा. तसेच यंदा पुणे महापालिकेत आरपीआयचा महापौर करावा, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
पुण्यात रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीत आयरपीआयला महायुतीने एकही जागा दिली नव्हती. तसेच महायुतीकडून सन्मान राखला जात नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत आरपीआयचे स्थानिक नेते आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी ऐन निवडणुकीवेळी महायुतीची साथ सोडली होती. त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी पक्षाकडून केली जात आहे. त्यात आठवले यांनी महापौरपदाची मागणी केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
आठवले म्हणाले, राज्याच्या सत्तेत वाटा देण्याचा शब्द महायुतीत सहभागी असलेल्या भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाने दिला होता. आरपीआयला मंत्रिमंडळात एक जागा द्यावी, यासाठी लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे. गेल्या पंचवार्षिकमध्येदेखील आरपीआयने महायुतीला खंबीरपणे पाठिंबा दिला. अडीच वर्षांच्या सत्तेत महायुतीने आरपीआयला एकही महामंडळ दिले नाही. आता मंत्रिमंडळात आरपीआयला स्थान द्यावे. महापालिकेच्या मागील निवडणुकीत महायुतीत आरपीआयला १२ जागा मिळाल्या होत्या. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत २० जागा द्याव्यात, अशीही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. लोकसभा, तसेच विधानसभेच्या निवडणुकीत आरपीआयला ठरावीक जागा द्याव्यात, अशी आमची मागणी होती. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. विधानसभेच्या निवडणुकीत दोन जागा आरपीआयला दिल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, या जागांवर लढलेले उमेदवार कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हावर लढले. ते काही आरपीआयचे उमेदवार नव्हते. राज्यात महायुतीला मोठे मताधिक्य मिळाले आहे. यामध्ये आरपीआयचा मोठा वाटा आहे. त्याची दखल घेत मंत्रिमंडळात स्थान द्यावे, असे आठवले म्हणाले.