पुण्यावरून बंगळुरूला जाणाऱ्या विमानात बिघाड
पुण्यातून विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुणे विमानातळावर प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. पुण्यावरून बंगळुरूला जाणाऱ्या विमानाने गेल्या १० तासापासून उड्डाण घेतले नसल्यामुळे प्रवाशी विमानतळावरच अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आता गोंधळ घालायला सुरूवात केली आहे.
पुणे ते बंगळुरू हे एअर एशियाचे विमान पुणे विमानतळावरून सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी आपल्या निर्धारित वेळेवर निघणार होते. मात्र, या विमानाने अद्यापही उड्डान केलेले नाही. त्यामुळे, सुमारे १५० हून अधिक प्रवाशी पुणे विमानतळावर अडकून पडले आहेत. बंगळुरूला जाण्यासाठी प्रवाशी सकाळी ५ वाजताच पुणे विमानतळावर पोहोचले होते. मात्र, एअर एशियाच्या विमानाने आपल्या निर्धारित वेळेत उड्डाण घेतले नाही. त्यामुळे प्रवाशांना प्रतिक्षा गृहातच थांबवून धरण्यात आले. याबाबत प्रवाशांनी विचारणा केली असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान उड्डाणाला उशिर होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच पुण्यावरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला उशीर झाला होता. साधारण ९ तासानंतर पुण्यावरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेतले होते. त्यावेळी सुमारे १८० हून अधिक प्रवाशी पुणे विमानतळावर अडकून पडले होते. त्यातच आता पुन्हा एकदा विमानतळावरील गोंधळ समोर आला आहे. गेल्या १० तासापासून विमानाने उड्डाण घेतलेले नाही.
“आम्ही सकाळी ५ वाजल्यापासून विमानतळावर येऊन थांबलो आहोत. मात्र, साधारण दुपारच्या १२ वाजेपर्यंत विमानाने उड्डाण घेतले नाही. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही विचारले असता तांत्रिक बिघाडामुळे विमानाला उशीर झाला आहे, असे आम्हाला सांगण्यात आले. त्यानंतर आता जवळपास अडीच ते तीन वाजत आहेत. मात्र, विमान कधी उड्डाण घेणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. शिवाय विमान कधी उड्डाण घेणार याबाबत प्रवाशांना काहीही सांगितले जात नाही”, अशी माहिती माध्यमांशी बोलताना काही प्रवाशांनी दिली आहे.