संग्रहित छायाचित्र
पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) दाखल गुन्ह्यात येरवडा कारागृहामधून जामिनावर सुटल्यानंतर एका गुंडाने ४० ते ५० साथीदारांसह बाईक रॅली काढली. स्वत: एका आलीशान गाडीत बसून दहशत माजवित मिरवीत गेला. या व्हिडिओ रिल्स सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच, या गुन्हेगाराच्या साथीदारांची अनवाणी पायांनी धिंड काढण्यात आली.
प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे (रा. भीम ज्योत, लक्ष्मी नगर, येरवडा), दीपक मदने, करण सोनवणे, अनिकेत कसबे, अंश पुंडे, अजय कसबे, सागर कसबे, अभिजीत ढवळे, राहुल रसाळ, नन्या कांबळे, रोशन पाटील, तुषार पेठे यांच्यासह साधारण ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई लहू एकनाथ गडमवाड यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ जानेवारी रोजी दहा वाजण्याच्या सुमारास गुंजन चौकात घडला होता. मोक्काच्या गुन्ह्यातून जामीन मिळवल्यावर प्रफुल्ल उर्फ गुड्या कसबे कारागृहाबाहेर आला होता. त्यावेळी त्याच्या स्वागतासाठी त्याचे ११ साथीदार व इतर ३५ ते ४० तरुण जमा झाले होते. त्यांनी ४ मोटारी व ३० दुचाकी वाहने बेदरकारपणे चालवली. आरडा ओरडा करून तसेच घोषणाबाजी करून येरवडा परिसरामध्ये दहशत निर्माण केली. ‘येरवड्यातील भाई मीच’ अशी चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करुन दहशत माजविली. अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिमत जाधव, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी कसबेच्या काही साथीदारांना जेरबंद केले.
येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली. तसेच, चौकात तात्पुरता मंडप उभा करुन पुणे विद्येचे माहेरघर, तात्पुरते पोलीस मदत केंद्र अशी पाटी तेथे लावली. पडद्याआड नागरिकांच्या समक्ष त्यांना चोप देण्यात आला. नागरिकांनी या कारवाईचे कौतुक केले. फरार झालेल्या कसबेचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. लंगडत चालणाऱ्या कसबेच्या साथीदारांना पाहून नवख्या गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली आहे.