संग्रहित छायाचित्र
धायरी: पुणे महापालिकेच्या हद्दीत असूनही गेल्या २८ वर्षांपासून डेव्हलपमेंट प्लॅन (डीपी) रस्ता न बनण्याच्या समस्येने धायरीकर त्रस्त झाले आहेत. या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी धायरीतील ग्रामस्थांनी अनोख्या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. धायरी गावातील वाहतूक कोंडीत अडकलेले त्रस्त नागरिकांनी या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे या पत्रकात लिहिले आहे.
डीपी रस्ता आणि वाहतूक समस्येचा प्रश्न गंभीर
धायरी हे झपाट्याने विकसित होणारे उपनगर असून, येथे नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी धायरीतील ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने, शासन-प्रशासनाशी पत्रव्यवहार तसेच नगरसेवक आणि आमदारांना अर्ज सादर केले आहेत. इतकेच नव्हे तर, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी राष्ट्रपतींनाही याबाबत पत्र लिहिले होते, ज्याची दखल घेत राष्ट्रपती कार्यालयाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत.
निबंध स्पर्धेचा विषय आणि पारितोषिके
"धायरी डीपी रोड न होण्यास कारणीभूत निवडून आलेले नगरसेवक, आमदार की त्यांना निवडून देणारे मतदार" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ३०० शब्दांमध्ये हा निबंध लिहायचा आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी ३ हजार रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी २ हजार रुपये, आणि तिसऱ्या क्रमांकासाठी १ हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती आयोजक निलेश दमिष्टे यांनी दिली.
कधीपर्यंत आणि कुठे सादर करायचाय निबंध?
१० जानेवारी पर्यंत सकाळी ११.३० ते रात्री ९.३० पर्यंत, धायरी मधील राजेशाही हॉटेल लेन नंबर ३१ ए येथे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत असून ६० पेक्षा जास्त निबंध आल्याचे आयोजकांनी सीविक मिररशी बोलताना सांगितले.