Accident on Kondhanpur road in Khed-Shivapur
पुणे : भरधाव पीएमपीएमएल बसची पाळीव जनावरांच्या कळपाला धडक बसली. बेदरकार बस चालकाने या अपघातात चार गायींचा बळी घेतला. तर, या घटनेत १० गायी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास खेड शिवापूर येथील कोंढणपूर रस्त्यावर घडला. अपघातानंतर शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी रस्ता अडवित आंदोलन करून नुकसान भरपाईची मागणी केली.
राजगड पोलिसांनी आरोपी पीएमपी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच, बस जप्त केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर ते कोढणपूर रस्तावर हा अपघात घडला. अपघातग्रस्त (एमएच १२, आरएन ६०६९) बस पुण्याकडे कात्रजला निघालेली होती. कोंढणपूर गावच्या हद्दीमधून ही बस जात असताना रस्ता मोकळा असल्याने बस चालकाने वेग वाढवला. सकाळची वेळ असल्याने जनावरांचा कळप चरण्यासाठी निघालेला होता. बस चालकाने बेदरकारपणे त्यांच्या अंगावर बस घातली.
ही धडक एवढी जोरात होती की, गायी उडून लांबवर उडून पडल्या. यामध्ये चार गायींचा जागीच मृत्यू झाला. तर, दहा गायी जखमी झाल्या आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. बस चालकाला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, आपल्या गायींची अवस्था पाहून त्यांचा मालक असलेल्या शेतकऱ्याचा जागेवरच बांध फुटला. गायींना कवटाळून त्याने देखील हंबरडा फोडला. संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता अडवून धरला. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली असून राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेश गवळी यांनी त्यांची समजूत काढली. त्यांच्याशी संवाद साधून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी ‘पीएमपीएमएल’कडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.