संग्रहित छायाचित्र
पुणे : राज्यात हील टॉप, हील स्लोप आणि बीडीपी याबाबत प्रत्येक ठिकाणचा प्रश्न वेगवेगळा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध ठिकाणच्या बीडीपी आणि हील टॉप, हील स्लोप नुसार प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुढील काळात राज्याचे याबाबत एकत्रित धोरण ठरवण्यात येईल अशी माहिती नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे महानगरपालिका अंतर्गत विकास कामे, प्रकल्पांचा आढावा घेणेबाबत नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री मिसाळ यांनी महापालिकेत शुक्रवारी आयुक्त राजेंद्र भोसले आणि इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली.
मिसाळ म्हणाल्या, पालिकेत एक वर्षाच्या विकास कामाचा आढावा नगर विकास मंत्री या अनुषंगाने घेतला. जे प्रकल्प प्रलंबित आहेत, त्याबाबत आणि त्यातील अडचणी यासंदर्भात चर्चा झाली. राज्य सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहे हे जाणून घेतले. समान पाणी योजना, पुण्यातील कुटुंबांना लावण्यात आलेला मालमत्ता कर, कॅन्टोन्मेंट मधील काही भागाचे पालिकेच्या हद्दीमधील विलीनीकरण याबाबत आढावा घेण्यात आला आहे.
रस्ता खरवडल्यानंतर २४ तासांत डांबरीकरण करा. अन्यथा ठेकेदारासह महापालिकेच्या इंजिनीअरवर कारवाई करण्याच्या सूचना राज्यमंत्री मिसाळ यांनी आढावा बैठकीत दिल्या.