Raireshwar Fort : शेतकऱ्याचा नाद खुळा... शेतीसाठी ट्रॅक्टर थेट नेला साडेचार हजार फुटावर

शेतकऱ्याने मनात आणले तर तो भन्नाट गोष्टी करतोच... अशाच एका शेतकऱ्याने 'शेतीसाठी काय पण' असे म्हणत नाद खुळा प्रकार केला आहे. शेतीसाठी तब्बल साडेचार हजार फुटांवर ट्रॅक्टर नेऊन आपले शेतीवरील प्रेम दाखवून दिले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 24 Oct 2023
  • 11:21 am
Raireshwar Fort : शेतकऱ्याचा नाद खुळा... शेतीसाठी ट्रॅक्टर थेट नेला साडेचार हजार फुटावर

शेतकऱ्याचा नाद खुळा... शेतीसाठी ट्रॅक्टर थेट नेला साडेचार हजार फुटावर

लक्ष्मण मोरे

पुणे : शेतकऱ्याने मनात आणले तर तो भन्नाट गोष्टी करतोच... अशाच एका शेतकऱ्याने 'शेतीसाठी काय पण' असे म्हणत नाद खुळा प्रकार केला आहे. शेतीसाठी तब्बल साडेचार हजार फुटांवर ट्रॅक्टर नेऊन आपले शेतीवरील प्रेम दाखवून दिले.

भोर तालुक्यातील किल्ले रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी पायवाट नाही. वर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आणि लोखंडी शिडीचा उपयोग केला जातो. ही शिडी तिव्र उताराची असल्याने शिडीवरुन गडावर‌ चढताना-उतरताना भिती वाटते. अशा स्थितीतही अशोक रामचंद्र जंगम आणि रविंद्र रामचंद्र जंगम या दोघा शेतकरी बंधूंनी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी केला. परंतु, रायरेश्वरावर ट्रॅक्टर न्यायचा कसा हा प्रश्न होता. सुरुवातीला हा ट्रॅक्टर रायरेश्वराच्या पायथ्याशी नेण्यात आला.  पायथ्यापाशी ट्रॅक्टर उभा मेकॅनिककडून ट्रक्टरचे टायर, इंजिन, मढगार्ड, साठा असे पार्ट ट्रॅक्टर पासून वेगळे करण्यात आले. अवजारे आणि ट्रक्टर‌पासून वेगळे केलेले पार्ट २० ते २५ ग्रामस्थांच्या मदतीने शिडीवरुन लाकडाच्या मेंढी लावून, रस्सीने बांधून डोली करत वर नेण्यात आले.

तसेच ट्रॅकरचा मेन‌ सांगाडा, मागचे टायर आणि इंजिन लाकडाच्या मेढी लावून डोली करत अगदी हळूवार पणे धोका न पत्करता कड्या कपाऱ्यातून अतिशय कठीण परिस्थितीत शिडीवरुन पठाराच्या सपाटावर नेण्यात आला. यासाठी ग्रामस्थांना मोठी धोकादायक कसरत करावी लागली. ट्रॅक्टरचे पार्ट आणि अवजारे पठारावर चढवायला दोन दिवस लागले. गुरुवारी  शिडीवरुन पठारावर गेल्यावर ट्रॅक्टरचे वेगळे केलेले पार्ट जोडण्यात आले. त्यानंतर ट्रॅक्टर चालू करुन गावठाणात नेण्यात आला. अशा प्रकारे स्वतःच्या आणि परिसरातल्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी रायरेश्वर किल्ल्यावर ट्रॅक्टर  नेण्याचे स्वप्न साकार केले असून आजवरच्या इतिहासात रायरेश्वरावर पहिल्यांदाच शेतीसाठी ट्रॅक्टर नेण्यात आला आहे.

पठारावर सेंद्रिय गव्हाची शेती बरोबरच नाचणी, वरईची शेती केली जाते. या शेतीची मशागत पारंपारीक मानव आणि बैलांच्या सहाय्याने केली जाते. जग यांत्रिकीकरणात पुढे जात असताना रायरेश्वरावर मात्र, यंत्र नेणं शक्य नसल्याने पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. परंतू रायरेश्वरावरील अशोक आणि रविंद्र यांनी अखेर ट्रॅक्टरच्या रुपाने पहिले शेती उपयोगी चारचाकी वाहन गडावर नेमण्याचा पराक्रम केला आहे.

किल्ले रायरेश्वरीला 16 किलोमीटर पसरलेल्या पठारावर 300 लोकसंख्या असून, 45 कुटुंबे राहतात.  हे ठिकाण भोरपासून 26 किलोमीटर अंतरावर असून परिवहन मंडळाची बस कोर्ले गावापर्यंत जाते. तेथून पुढे रायरेश्वराकडे जाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. त्यानंतर किल्ल्यावरील पठरावर जाण्यासाठी पायथ्याजवळ असलेल्या लोखंडी शिडीचा वापर ग्रामस्थ आणि पर्यटक पूर्वी पासून करीत आहेत.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest