श्रावण मासानिमित्त ५ हजार महिलांनी घेतला बांगडया आणि मेहंदीचा आनंद
महाराष्ट्राची संस्कृती जपत आपले सण-उत्सव अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि सातत्याने त्यांचे जतन व्हावे, याकरिता पुण्यामध्ये श्रावण मासानिमित्त ५ हजार महिलांनी बांगडया भरणे आणि मेहंदी काढण्याचा आनंद लुटला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावत बांगडया भरुन मेहंदी काढण्यासोबतच फुगडी खेळण्यात महिलांसोबत सहभाग घेतला.
निमित्त होते, प्रल्हाद गवळी मित्र परिवार तर्फे कसबा पेठेतील आर.सी.एम.गुजराथी हायस्कूल येथे ५ हजार महिलांसाठी बांगडया भरणे व मेहंदी काढणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महिला जिल्हाध्यक्षा सुशीला नेटके, वनिता वागस्कर, मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ, अभिषेक थिटे, आयोजक प्रल्हाद गवळी आदी उपस्थित होते. अगदी पाच-सहा वर्षाच्या चिमुकलीपासून ते ऐंशी वर्षाच्या आजींपर्यंत सर्वच वयोगटातील महिलांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरने उपक्रमाला विशेष सहकार्य केले.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “मंगळागौरीचे खेळ, बांगडया, मेहंदी हे पाहून श्रावणात साजरे होणारे सण आणि जुने दिवस यानिमित्ताने पुन्हा एकदा आल्यासारखे वाटत आहे. महिलांना आनंद देण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. महिलांकरिता असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत.”
प्रल्हाद गवळी म्हणाले, “सर्वसामान्य महिला चूल आणि मुल यासोबतच आपले कुटुंब याभोवती बहुतांश वेळ असतात. त्यांना वेगळ्या प्रकारचा आनंद देता यावा आणि सर्व वयोगटातील, क्षेत्रातील महिलांनी एकत्र यावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपले सण आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न यानिमित्ताने आम्ही करीत आहोत. महिलांना मंगळागौरीचे खेळ पाहण्यासोबतच बांगडया भरणे, मेहंदी काढणे आणि टिकलीचे पाकिट देखील देण्यात आले.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.