अटक
पुण्यातील कैलास स्मशान भुमीकडे जाणाऱ्या ढोले पाटील रोडवरील अतिक्रमण कारवाईदरम्यान मंगळवारी (दि. १६) सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि एका सुरक्षा रक्षकाला लोकांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलीसांनी आता ५ जणांना अटक केली आहे.
गणेश रतनसिंग परदेशी (वय ४०), रोहित सुपरसिंग परदेशी (वय २५), रोहन सुपरसिंग परदेशी (वय २५), महेशसिंग उर्फ लखन जतनसिंग परदेशी (वय ३३) आणि सुरज सुपरसिंग परदेशी (वय २७, रा. सर्व सनं. १६५, केनडी रोड, परदेशी वाडा, बंडगार्डन, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक प्रशांत कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ए.आय.एस. एस.एम.एस. कॉलेजच्या शेजारील कैलास स्मशान भुमीकडे जाणाऱ्या ढोले पाटील रोडवर मोठ्या प्रमाणात हात गाडीधारकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण हटवण्यासाठी मंगळवारी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मोहिम राबवली जात होती. यावेळी हात गाड्यांवर कारवाई करत असताना संबंधित लोकांनी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक प्रशांत कोळेकर यांच्यासह त्यांच्या टीमवर हल्ला केला.
यात प्रशांत कोळेकर आणि एका सुरक्षा रक्षकाला लोकांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी कोळेकर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलीसांनी कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, १४३, १४७ आणि ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.