आता मनपा ते भोसरी विनाथांबा, विनावाहक; पीएमपीएमएलची वातानुकूलित बस सुस्साट
महापालिका ते भोसरी दरम्यानचा प्रवास आता अधिक जलद गतीने होणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) मनपा ते भोसरी या मार्गावर वातानुकूलित विनाथांबा / विनावाहक बस सेवा सुरु करण्यात आली आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून ही बससेवा सुरू कऱण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी नागरिकांना जलद पोहचणे शक्य होणार असून तिकीट दर हा अन्य बस प्रमाणेच असणार आहे.
पुणे मनपा ते भोसरी या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर बससेवा सुरु करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, वाहतूक नियोजन अधिकारी विजय रांजणे, भोसरीचे डेपोचे डेपो मॅनेजर भास्कर दहातोंडे, न.ता. वाडी डेपोचे डेपो मॅनेजर संतोष किरवे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले की, “प्रवासी नागरिकांना जलद प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने पुणे महानगर परिवहन महामंडळाने मनपा ते भोसरी या मार्गावर दोन बसच्या माध्यमातून विनाथांबा / विनावाहक बस सेवा सुरु केली आहे. प्रवासी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर बसेसमध्ये आणखी वाढ करण्यात येईल. तरी मनपा ते भोसरी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांनी पीएमपीएमएलच्या किफायतशीर दरात असणाऱ्या वातानुकूलीत विनाथांबा / विनावाहक बससेवेचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.