आता शहरातील ध्वनीचे नियंत्रण
रस्त्यावरील वाहने, कर्णकर्कश हॉर्न, रस्त्यावरची खोदकामे, सायरन असे वेगवेगळे आवाज एकाच वेळी दररोज आपल्या कानावर सातत्याने आदळत असतात, पण आवाजाची ही तीव्रता नेमकी किती आहे, याचे मोजमाप नियमितपणे कधी पुण्यात झाले नव्हते. त्यामुळे आता ध्वनिप्रदूषणाकडे बारकाईने ‘कान’ देणारी यंत्रणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) शहराच्या वेगवेगळ्या भागात लवकरच बसवणार असल्याची माहिती पुढे आली.
शहरात गणपती विसर्जन मिरवणूक, दिवाळीतील दिवसांमध्ये फटाक्यांच्या आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण मोजणारी यंत्रणा ‘एमपीसीबी’तर्फे उभी केली जाते, पण विशिष्ट भागात नियमितपणे होणारे ध्वनिप्रदूषणाची पातळी सातत्याने मोजून त्याचे विश्लेषण करणारी कोणतीही यंत्रणा शहरात आतापर्यंत नव्हती. ती सर्व प्रथम बसविण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
ध्वनिप्रदूषणाची माहिती संकलित करण्यासाठी शहरात दोन ठिकाणी लवकरच उपकरणे बसविण्यात येणार आहे. त्यातून मिळालेल्या माहितीच्या विश्लेषणातून ध्वनिप्रदूषणाचा मुख्य स्रोत आणि त्याची पातळी समजेल. त्या आधारावर ध्वनिप्रदूषण नियंत्रणाचे धोरण आखता येईल.
- प्रताप जगताप,
उप-प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ