नोटीस बेकायदेशीर आणि चुकीची, पुनीत बालन यांचे महापालिकेला उत्तर
अमोल अवचिते
पुणे : दहिहंडी उत्सवादरम्यान अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स आदी लावून (Notice) सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केले. असा आरोप करत महापालिकेने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) ट्रस्ट उत्सव प्रमुख आणि ऑक्सिरिच कंपनीचे पुनीत बालन (Puneet Balan) यांना 3 कोटी 20 लाखांचा दंड ठोठावल्याची नोटीस (PMC) महापालिकेने पाठविली आहे. त्या नोटीसला बालन यांनी उत्तर दिले असून नोटीस बेकायदेशीर आणि चुकीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आणि उप आयुक्त माधव जगताप यांनी बालन यांनी नोटीस पाठविली होती. त्यात दंडासह बालन यांच्याकडून खुलासा देखील मागवला होता. त्यानुसार आता बालन यांनी आपला खुलासा माधव जगताप यांना सादर केला आहे. त्यात बालन यांनी म्हटले आहे कि, जगताप यांनी दिलेली सदर नोटीस चुकीची व बेकायदेशीर असून सदर नोटीस मंडळाना देण्याऐवजी जाणूनबुजून व वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामी करिता माझ्या नावे नोटीस दिली आहे. दरम्यान बालन यांच्या खुलाश्यावर महापालिका काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तसेच या नोटीसीवर संताप व्यक्त करत शहारातील सर्वच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करुन महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ निषेध आंदोलन केले होते. त्यावेळी महापालिकेकडून नोटीसच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती.
पुनीत बालन यांनी नोटीसीमध्ये असे म्हटले आहे की, ''सार्वजनिक उत्सव सादर करणे आणि त्यास निःशुल्क मान्यता देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली १४ सप्टेंबर रोजी बैठक घेवून निर्णय घेतला आहे, असे वृत्तपत्रात आले आहे. शहरातील गणेशउत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सव मंडप/ स्टेज करिता पूर्वीपासूनच कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच सन २०१९ पूर्वी स्थानिक पोलीस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत कमानी व रनिंग मंडप यांना आकारण्यात येत असलेले परवाना शुल्क देखील महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना व विभाग मुख्य सभा ठराव क्रमांक ५६४ नुसार रद्द करण्यास मान्यता दिलेली असून त्याबाबत २०१९ पासून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
शहरात सन २०१९ गणेशउत्सव कालावधीत मोहरम, दहीहंडी आणि गणेशउत्सव मंडळाना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या नि: शुल्क परवानगी ही पुढील ५ वर्षा करिता म्हणजेच सन २०२२ पासून सन २०२७ सालापर्यंत गृहीत धरण्याबाबत महानगरपालिकेकडून सार्वजनिक गणेशउत्सव २०२२ करिता सर्व गणेश मंडळे, पोलीस अधिकारी व मनपा अधिकारी यांच्या बैठकीत एकत्रित निर्णय घेण्यात आलेला होता. या सर्व गोष्टींचा विचार करता जगताप यांनी पाठविलेली नोटीस ही माझे व्यक्तिमत्व बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून मला पाठवली आहे. तसेच तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा व आयोग्य असून त्यानुसार आपण देण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात यावी तसेच सदर नोटीस केल्या बाबत प्रसारमाध्यमांना देखील कळवावे. ज्याप्रमाणे सरकारने निर्बंधमुक्त उत्सवाची घोषणा केलेली आहे. त्यानुसार दंडाची मागणी करणे बेकायदेशीर आणि चुकीचे आहे. तसेच अशा वसुली मिळकतकरातून करण्याबाबत उल्लेख देखील बेकायदेशीर आहे, याचीही नोंद घ्यावी''.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.