पुणेकरांसाठी नव्हे तर यांच्यासाठी केले महापालिकेने रस्ते चकाचक !
पुण्यातील नवी पेठ येथील टिळक शिक्षण महाविद्यालय येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात असणाऱ्या सर्व रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम सध्या महापालिका प्रशासनाकडून केले जात आहेत. त्यामुळे, सातत्याने मागणी करून देखील पुणेकरांना खड्डे बुजविण्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. मात्र, शहरात बडे नेते येणार असल्यास तात्काळ खड्ड्यांच्या डागडुजीचे कामे हाती घेतली जातात. शहरातील रस्ते केवळ बड्या नेत्यांसाठीच बनले आहेत का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी परिवारातील संघटनांची समन्वय बैठक घेतली जाते. त्यानुसार यंदा ही बैठक पुण्यात होणार आहे. १४ ते १६ सप्टेंबर रोजी होणार आहेत. या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, यांच्यासह संघ परिवारातील ३५ ते ४० संघटनाचे २५० हुन अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
तसेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे देखील या बैठकीला उपस्थितीत राहणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देखील उपस्थितीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. देशातील बडे नेते पुण्यात येणार आहेत. असे राजकीय बडे नेते जेव्हा पुण्यात येतात तेव्हा प्रशासन अलर्ट मोडवर येते. त्यामुळे, रस्ते आणि इतर कामे मार्गी लावताना पाहायला मिळतात. बड्या नेत्यांसाठी रस्त्यांची डागडुजी केली जाते, मात्र, सर्वसामान्य नागरिकांसाठी का केली जात नाही? जनतेला होणाऱ्या नाहक त्रासाचा का विचार केला जात नाही ? असे प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.