संग्रहित छायाचित्र
राज्यातील कारागृहात कैद्यांना सुधारणा व पुनर्वसनासाठी ठेवले जाते. कैद्यांमधील गुन्हेगारीवृत्ती कमी होऊन तो एक चांगला नागरिक घडावा असा यामागचा उद्देश असतो. मात्र, राज्यातील कारागृहात असणा-या कैद्यांना पंचतारांकित हॅाटेलप्रमाणे सोई-सुविधा मिळत आहेत. त्यामुळे कैद्यांमधील गुन्हेगारी वृत्ती कशी कमी होणार, असा प्रश्न निर्माण होतो.
कारागृहातील सोयीसुविधांचे उदाहरण द्यायचे झाल्यास आंघोळीसाठी मोती साबण, फेस वॅाश, शॅावर, जेल, फेअर ॲण्ड लव्हली, हेअर कलर, शेव्हिंग क्रीम आदी वस्तू कारागृहात उपलब्ध आहेत. न्याहरीसाठी विविध फळे, दूध, अंडी, बिस्किटांचे डझनभर प्रकार, खारी, टोस्ट आदी बेकरीतील खाद्यपदार्थांची तेथे रेलचेल आहे. तसेच हॅार्लिक्स, बोर्नव्हिटा, च्यवनप्राश, मिक्स फ्रुटजाम, ओट्स, बोकडाचे मटण, कोंबडीचे मटण, त्यासाठीचे सर्व प्रकारचे मसाले, बासमती तांदूळ, पापड, केशर आदी वस्तू मिळतात. याच्याबरोबरीने पुरणपोळी, ड्रायफ्रूट तर दिवाळीत करंजी, अनारसे, शंकरपाळी, रवा, मोतीचूर व बेसन लाडू ते नामांकित कंपनीचे टी शर्ट, पॅन्ट, शर्टपासून ते अंडरगार्मेंटचे हवे ते कपडे मिळतात. व्यसनासाठी तंबाखू आणि विविध कंपन्यांच्या सिगारेटही उपलब्ध आहेत. अशा वस्तूंची यादी पाहिली तर हे कारागृह आहे की पंचतारांकित हॅाटेल असा प्रश्न पडल्यास नवल वाटायला नको. पैसेवाल्या कैद्यांना अशा वस्तू जर मिळत असतील तर जन्मठेपेची शिक्षा ते ऐष आरामात घालवतील यात शंकाच नाही.
राज्यात साठ कारागृहे आहेत. यापैकी नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत. तेथे तब्बल तीस हजार कैदी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. यातील तीस टक्के पक्के कैदी तर सत्तर टक्के कच्चे कैदी आहेत. या कैद्यांपैकी अनेक कैदी गुन्हेगारीतील सराईत आहेत, तर काही श्रीमंतही असतात. अशा कैद्यांना कारागृह हे शिक्षेचे ठिकाण न वाटता, एक पंचतारांकित हॅाटेल वाटते. याचे कारण कारागृहातील उपाहारगृहात मिळणा-या शेकडो ऐष आरामांच्या वस्तूंमुळे त्यांचे जीवन सुखकर, आनंददायी झाले आहे.
कारागृहातील कैद्यांना सकाळी आंघोळीच्या साबणापासून ते रात्री झोपताना डासांपासून बचाव करण्यासाठी ओडोमासपर्यंतच्या वस्तू मिळतात. पैसेवाल्या कैद्यांना सकाळी न्याहरीसाठी गरमागरम दूध, अंडी, विविध हंगामात मिळणारी विविध फळे हवी तेवढी उपलब्ध असतात. दुपारी व संध्याकाळी जेवणात चिकन, मटण, बासमती तांदळाची बिर्याणी असते. विविध कंपन्यांची बिस्किटे, बेकरी उत्पादने मिळतात. याशिवाय शेंगदाणा लाडू, बाकरवडी, फरसाणही मिळते.
ड्रायफ्रूट, फळे व इतर खाद्यपदार्थ
कारागृहातील उपाहारगृहात खजूर, खारीक, मनुके, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आदी ड्रायफ्रूट तर मोसंबी, संत्रे, द्राक्षे, सफरचंद, आंबे, कलिंगड, अननस, चिकू, स्ट्रॉबेरी, डाळिंब, अंजीर, केळी, खरबूज, पेरू आदी हंगामी फळे उपलब्ध असतात. त्यामुळे कैदी कारागृहात आजारी पडण्याची शक्यता नसते. दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये गाई, म्हशीचे दूध, ताक, दही, पनीर, लस्सी, श्रीखंड, चीज, दूध पावडर, आईस्क्रीम, ज्यूसही उपलब्ध असते.
स्टेशनरी, होजिअरी साहित्य
कारागृहाच्या उपाहारगृहात लेखन साहित्य, स्केचपेन, वॅाटरकलर, नोटबुक, आखीव कागद, फोन डायरी, आर्चबुक, प्लास्टिक फोल्डर, कागदी पाकिटांपासून ते पाटी-पेन्सिलपर्यंतच्या वस्तू उपलब्ध आहेत. उलन कानटोपी, स्वेटर, अंडरवेअर, बनियन, बर्मुडा, नामांकित कंपनीचे टी शर्ट, शर्ट, पॅन्ट उपलब्ध आहेत. चप्पल, सॅन्डल, रेनकोट, छत्री, टिफिन, मच्छर अगरबत्ती, अगरबत्ती, पेपर नॅपकिन पर्यंतच्या वस्तूही उपाहारगृहात मिळतात.
मापात पाप
येरवडा कारागृहात अनेक वस्तू छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने विकत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये गुडनाईट कॅाईल, वही, पेन, प्लास्टिक बकेट, अगरबत्ती, चिक्की, बिस्किटे, पाण्याची बाटली, फरसाण, बाकरवडी, खाकरा, खजूर, बदाम व काजू आदी वस्तूंचा समावेश असतो. याची तक्रार अनेक व्यापा-यांनी सहीनिशी राज्याच्या गृह विभागाकडे केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.