रुपाली पाटील ठोंबरे
भाजपा-शिंदे गटामुळे राजकारणाचा दर्जा खालावला आहे. विरोधकांबाबत बोलताना वारंवार सूड बुद्धीने बोलले जाते, यासोबतच अनेकदा अश्लील शब्द देखील वापरले जातात. गौतमी पाटील ही स्वतःच्या पोटासाठी व्यवसाय करते तिची तुलना संजय राऊत यांच्याबरोबर करणे म्हणजे महिलांना हिणवण्याचे कृत्य आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना प्रत्तूत्तर दिले आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी आज सिंधुदुर्घमधील कणकवली येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना “महाविकास आघाडीची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत” अशा शब्दात जहरी टीका केली होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
रुपाली पाटील म्हणाल्या की, “एकीकडे महिलांचे संरक्षण केले पाहिजे सक्षमीकरण केले पाहिजे, असे म्हणणारे दुसरीकडे महिलांना हिणवण्याचे काम करत आहेत. दिवसेंदिवस राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. संजय राऊतांची तुलना गौतमी पाटलांशी करणारे नितेश राणे हे भाजपचे नाचे आहेत, केवळ संजय राऊत यांना प्रत्तूत्तर देण्यासाठी ते माध्यमांसमोर येत असतात”, असेही रुपाली पाटील म्हणाल्या.