Mundhwa Chowk : ''रात्रीस खेळ चाले २''; खराडी बायपास रस्त्यावरील मुंढवा चौकातील अतिक्रमणावर हातोडा

या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेकडून केली जात आहे. गुरुवारी रात्री पालिकेने दुसऱ्या टप्प्यातील अतिक्रमण विरोधी कारवाई करुन रस्ता मोकळा केला. यामुळे प्रशासनाला 'बॉटल नेक' काढण्यात प्रशासनाला यश आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 20 Oct 2023
  • 03:32 pm
Mundhwa Chowk : ''रात्रीस खेळ चाले २''; खराडी बाय रस्त्यावरील मुंढवा चौकातील अतिक्रमणावर हातोडा

''रात्रीस खेळ चाले २''; खराडी बायपास रस्त्यावरील मुंढवा चौकातील अतिक्रमणावर हातोडा

पुणे : खराडी बायपास रस्त्यावरील मुंढवा गावातील महात्मा फुले चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेकडून केली जात आहे. गुरुवारी रात्री पालिकेने दुसऱ्या टप्प्यातील अतिक्रमण विरोधी कारवाई करुन रस्ता मोकळा केला. यामुळे प्रशासनाला 'बॉटल नेक' काढण्यात प्रशासनाला यश आहे.

खराडी बायपास रस्त्यावरील मुंढवा उड्डाणपुला पासून मुंढव्यातील महात्मा फुले चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला जागामालकांनी राडाराडा टाकून रस्ता अडवला होता. गेल्या ३२ वर्षांपासून हे रुंदीकरण रखडले होते. त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होऊन, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अतिक्रमण कारवाई केली जात नव्हती. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी १९ ऑगस्ट महिन्यात धडक कारवाई करुन रेल्वे गेट वरील उड्डाणपुल ते मुंढवा चौक या दरम्यानच्या रस्त्यावरील अतिक्रमण विरोधी कारवाई करत २४ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात आले होते.

भूसंपादनाअभावी तब्बल ३२ वर्षे रखडलेल्या मगरपट्टा-खराडी रस्त्यावरील मुंढवा चौकातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न या कारवाईमुळे सुटला. त्यानंतर आता पुन्हा एकदा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यात चौकातून मुळा-मुठा नदी पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. या कारवाईतुन २४ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात आले. तसेच काही भाग न्यायालयीन लढाईत अडकला असल्याने त्यावर कारवाई झाली नाही. तसेच झाडे तोडण्यात आली नाहीत. मात्र कायदेशीर बाबींवर तोडगा काढून भविष्यात हा रस्ता शंभर टक्के ताब्यात घेतला जाणार आहे.

कारवाईला रात्री ९.३० वाजता सुरवात करण्यात येवून ती सकाळी ६ वाजता थांबली. या कारवाईदरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंता संदीप रणवरे, मुंढवा विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे, भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या प्रतिभा पाटील, प्रसाद काटकर, अधिक्षक अभियंता साहेब दांडगे, कार्यकारी अभियंता संदीप रणवरे, रोहिदास गव्हाणे, अतिक्रमण विभागाचे, उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते.

शहरासह उपनगर भागात वाहतूक कोंडीने नागरिकांचा श्वास कोंडला जात आहे. वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुक नियोजन केले जात आहे. त्यासोबत रस्त्यावर अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. शहरातील अनेक रस्ते भाजी विक्रेत्यांनी, नागरिकांनी, दुकानदारांनी अतिक्रमण करुन व्यापले आहेत. रस्त्याची जागा असून ती खाली करण्यास नागरिक स्वत: हून पुढे येत नाही. त्यामुळे अशा अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडून विनंती अर्ज केला जात आहे. नोटीस देखील दिली जात आहे. त्यानंतर धडक अतिक्रमण विरोधी कारवाई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. ही कारवाई अशीच सुरु राहणार आहे. मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी भविष्यात मोठी कारवाई केली जाणार आहे. तसेच नियोजन पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.

मुंढवा रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. रस्त्यावर अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.चौकाच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. यामुळे वाहतुकीवर बराच चांगला परिणाम होईल. राहिलेले अतिक्रमण कायदेशीर बाबींमुळे राहिले आहे. ते दुर झाले तेही काढण्यात येईल. शंभर टक्के रस्ता मोकळा करण्यात येईल.

     - विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त महापालिका.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest