पुणे मेट्रोचा नवा विक्रम, रविवारी इतक्या लोकांनी केला प्रवास
पुणेकरांनी रविवारी मेट्रो प्रवाशाचा पुन्हा एकदा नवा विक्रम केला आहे. रविवारचा मुहूर्त साधत एकाच दिवसात तब्बल ८० हजार ८६८ पुणेकरांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे. यामुळे पुणे मेट्रोचे एक दिवसाचे उत्पन्न कोटीच्या घरात गेले आहे. मेट्रोच्या शिवाजीनगर स्थानक, वनाज मेट्रो स्थानक, रुबी हॉल मेट्रो स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी झाले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले. यानंतर पुणेकर मेट्रो प्रवासाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रस्तावरील खासगी वाहने कमी होत असून प्रदूषणाची पातळी सुधारणार आहे. शनिवार आणि रविवारी मेट्रोमधून प्रवासासाठी सुट असल्यामुळे या दोन दिवशी प्रवाशांची चांगली गर्दी होत आहे.
मेट्रोतून प्रवास करणाऱ्या शनिवार आणि रविवारी ३० टक्के सुट देण्यात येते. त्यामुळे मेट्रो प्रवास करणाऱ्यांची संख्या या दोन दिवसांत वाढत असते. तसेच मेट्रोने विद्यार्थ्यांना सवलत दिली आहे. सर्व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तिकीट दरात ३० टक्के सवलत दिली आहे. मेट्रोचे भाडे १० ते ३० रुपयांपर्यंत ठेवण्यात आलेले आहे. दर दहा मिनिटांना मेट्रो असणार आहे. कमी गर्दीच्या वेळी पंधरा मिनिटांच्या अंतराने मेट्रोची सेवा असेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.