पुण्यात दहीहंडीचा नवा अध्याय; महिला, पुरूष नव्हे तर तृतीयपंथी फोडणार मटकी
राज्यात दहीहंडी सण साजरा कऱण्यासाठी गोविंदा पथकांची जय्यत तयारी सुरु आहे. विविध ठिकाणी थर रचण्याचा कसून सरावही सुरु झाला आहे. गेली काही वर्षे पुरुषांबरोबर महिला पथकही विविध शहरांमध्ये सहभागी होत असल्याचे चित्र आहे. आता या उत्सवात तृतीयपंथीयही सहभागी होणार आहेत. यातील चार पथकांचा बहुमान पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला मिळाला आहे.
दरवर्षी प्रमाणे गोकुळाष्टमी सणाच्या निमित्ताने कुठे पाच थर, तर कुठे सात थरची दहीहंडी पाहण्यास मिळते. आजपर्यंत पुरुष आणि स्त्रियांचे गोविंदा पथक होते. पण आता त्यांच्या बरोबरीला समाजापासून कायम वंचित राहिलेल्या तृतीयपंथी यांचा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील १०० जणांचे चार संघ तयार करण्यात आले आहे. प्रत्येक संघात २५ तृतीयपंथीय सदस्यांचा सहभाग असणार आहे. येत्या सात सप्टेंबरला पुण्यातील नारायण पेठेतील गोगटे प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दहीहंडी फोडण्यात येणार आहे.
दीपस्तंभचे विश्वस्त आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सामाजिक कार्यकर्त्यां शर्वरी गावंडे आणि शिवप्रताप संस्था यांच्या माध्यमांतून तृतीयपंथी यांच्या दहीहंडीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. याबाबत बोलताना मानकर म्हणाले की, "समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे तृतीयपंथी यांना देखील आहे. आज तृतीयपंथी विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहे. ही चांगली बाब असून समाजाने त्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे स्विकारले पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही यंदा प्रथमच तृतीयपंथी यांचे गोविंदा पथक तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कामाला चांगला प्रतिसाद मिळाला.”
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.