उद्योगासाठी मराठा तरुणांना महामंडळाचे अर्थसहाय्य
"अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने आणलेल्या योजनेंतर्गत ६५ हजार तरुणांनी उद्योगासाठी घेतलेल्या ४५०० कोटींचे कर्ज घेतले असून, त्याचा ४८० कोटींचा व्याज परतावा महामंडळाने भरला आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी उद्योगशील बनावे. कर्ज घेण्याची व ते फेडण्याची मानसिकता ठेवत उद्योग सुरु करावेत. महामंडळाच्या अर्थसहाय्याचा लाभ घ्यावा," असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे बिनव्याजी कर्जावर आयोजित मार्गदर्शन सत्रात नरेंद्र पाटील बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या फिरोदिया सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सहकार व कामगार कायद्याचे सल्लागार ऍड. सुभाष मोहिते यांनी उद्योगांसाठी बिनव्याजी कर्ज या विषयावर मार्गदर्शन केले. प्रसंगी मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण, बाळासाहेब आमराळे, मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे आदी उपस्थित होते.
नरेंद्र पाटील म्हणाले, "तरुणांनी आपले सिबिल व आर्थिक चारित्र्य चांगले ठेवावे. समाजाच्या शेवटापर्यंत ही बिनव्याजी कर्ज योजना पोहोचावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. वार्षिक उत्पन्न आठ लाख असेल, तर १५ लाखाचे कर्ज घेता येते. त्याचे व्याज सबसिडी म्हणून महामंडळ भरते. राष्ट्रीयीकृत बँकांना प्राधान्य दिले जात असून, सहकारी बँकानाही तारण घेऊन १२ टक्के व्याजाने कर्ज देण्याची विनंती केली जात आहे. ज्या कारणासाठी कर्ज घेतले, त्यासाठीच ते वापरावे. शेतीपूरक व्यवसायासाठी ही कर्ज योजना फारच चांगली असून, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री, शेळी पालन, कोंबडी पालन असे विविध व्यवसाय सुरु करता येतील. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी आपले जीवन त्यागले. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातील मराठा समाज आणि माथाडी कामगारांच्या विकासाला प्राधान्य देण्याचे काम करत आहे."
अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, "बॅंका आणि उद्योग एकमेकाना पूरक आहेत. व्यावसायिकांना कर्ज देण्यासाठी बँक अनुकूल असते. त्यासाठी आपण आपली पात्रता, कौशल्य, विश्वासार्हता वाढवायला हवी. मराठा समाजातील तरुणांनी उभे राहिले पाहिजे. मानसिकता बदलण्याची आणि उद्योग करण्यासाठी तरुणांना उद्युक्त करण्याची गरज आहे. आपण जो उद्योग करतोय, त्याचा सखोल अभ्यास, आर्थिक नियोजन, दूरदृष्टीने त्यातील खाचाखोचा समजून घेता आल्या पाहिजेत. कर्ज काढले पाहिजे, ते फेडले पाहिजे. कर्जावर आधारित प्रकल्प अहवाल नसावा, तर प्रकल्प अहवालाच्या आधारे कर्ज घ्यावे. आपल्याला परवडेल असे कर्ज घ्यावे. क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतले, तर परतफेड होत नाही; अडचणी येतात. मराठा उद्योजक तयार करण्याचे काम आपल्याला करावे लागेल. एकमेकांना सहाय्य करण्याचे काम करावे."
अरुण निम्हण म्हणाले, "मराठा समाजातील उद्योजकांना एका व्यासपीठावर आणून एकमेकांना पूरक काम करण्याचा प्रयत्न असोसिएशन मार्फत सुरु आहे. सामाजिक उपक्रमांतही संस्था योगदान देत आहे. नव्या पिढीतील तरुणांना उद्योगासाठी प्रोत्साहित केले जात आहे. नवउद्योजकांना मार्गदर्शक असे विविध उपक्रम राबविले जात आहेत."बाळासाहेब आमराळे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. ऋतुजा मोरे यांनी सूत्रसंचालन केले. आश्रम काळे यांनी संस्थेविषयी सांगितले. मुरलीधर फडतरे यांनी आभार मानले. महेश कराळे व नियंत लोहकरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.