संग्रहित छायाचित्र
पुणे : दिवाळी सण (Diwali) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीनिमित्ताने महापालिका (PMC) दरवर्षी फटाका स्टॉलसाठी (Fataka Stol) जागा भाड्याने देत असते. त्यासाठी ऑफलाईन लिलाव पध्दत राबविली जात होती. त्यावेळी स्टॉलच्या लिलावात राजकीय (political) पुढाऱ्यांच्या दादागिरीपुढे अनेकांना लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडावे लागत होते. त्यामुळे पालिकेने यंदा पुढाऱ्यांच्या दादागिराला लगाम लावत थेट फटाका स्टॉलसाठी यंदा ऑनलाइन लिलाव पद्धत लागू करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. त्यामुळे इच्छुकांना समान संधी मिळणार आहे.
महापालिका फटाका स्टॉलच्या जागा भाड्याने देण्यासाठी महापालिकेने यंदापासून ऑनलाइन लिलाव ३० ऑक्टोबर रोजी करणार आहे. क्षेत्रिय कार्यालयानुसार फटाका स्टॉलसाठी शहरातील १२ ठिकाणी १६३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. महापालिकेतर्फे वर्तक बागेच्या शेजारी नदीकाठच्या रस्त्यावर स्टॉलसाठी भाड्याने जागा दिली जाते. गेल्या वर्षी तेथे ३५ स्टॉलसाठी लिलाव घेण्यात आला होता. त्या वेळी ६६ जणांनी अर्ज केले होते. लिलाव सुरु झाल्यानंतर काही स्थानिक पुढाऱ्यांनी दादागिरी करीत अनेकांना बोली लावण्यापासून रोखले होते. त्यावरून गोंधळ झाला होता. त्याचवेळी काही जणांनी ऑनलाइन बोलीच्या पद्धतीची मागणी केली होती. वर्तक बागेसह कोंढवा, हडपसर, धानोरी, कोथरूड, पर्वती, कात्रज, धायरी, कल्याणीनगर, खराडी, बालेवाडी, हडपसर येथे फटाका स्टॉल असणार आहेत.
महापालिकेने यंदा फटाका स्टॉलसाठी ऑफलाईन ऐवजी ऑनलाइन बोली लावण्याची पध्दत लागू करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. शुल्क भरल्यानंतर व्यावसायिकांना लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. अर्जाची करण्यात असल्याने इच्छुकांना अर्ज करता येतील.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.