खोदकाम जोमात; दंडवसुली कोमात
अमोल अवचिते
महापालिकेच्या जागेवर अथवा रस्त्यावर अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येते. मिळकत कर न भरल्यास संपत्ती जप्त करण्यापर्यंत कारवाई केली जाते. पालिका प्रशासनाकडून मिळकत कर तसेच इतर येणी वसुली करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कडक कारवाईदेखील केली जात आहे. मात्र दुसरीकडे परवानगी न घेता पालिकेच्या रस्त्यावर खोदकाम केल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेल्या कोट्यवधीचा दंड वसुलीसाठी महापालिका उदासीन असल्याचे दिसून येते आहे. विमाननगर भागातील रस्ते खोदल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र दंड वसूल करण्यासाठी महापालिकेने काय केले याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नसल्याचे समोर आले आहे.
वडगाव शेरी मतदारसंघातील विमाननगर भागातील साकोरेनगर, सोमनाथनगर, दत्त मंदिर चौक ते खालसा डेअरी, दिशा स्कायलाईन, नागपाल रस्ता, खराडीतील दुर्गा माता मंदिर, फिनिक्स मॉल ते श्री कृष्ण हॉटेल, विमाननगर मधील म्हाडाचा रस्ता, गणपती चौक ते न्याती इम्प्रेसपर्यंतचा रस्ता आदी रस्ते परवानगी न घेता खोदण्यात आले होते. त्यामुळे पालिकेकडून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. रस्त्याचे नुकसान झाल्याने ते नुकसान आता दंडाच्या रकमेतून वसूल होईल अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेकडून केवळ दंड आकारण्याशिवाय पुढे कोणतीही कारवाई होत नसल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते आशिष माने यांनी
रस्ता खोदल्याप्रकरणी कारवाई करून किती दंड वसुली केली याची माहिती माहिती अधिकारात विचारली होती. त्यावर महापालिकेने अद्याप एकही रुपया वसुली केली नसल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आता ठेकेदारांवर कृपादृष्टी का दाखवण्यात येत आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेला प्रामुख्याने मिळकत करातून मोठे उत्पन्न मिळते. त्यासोबतच पालिकेकडून बेकायदा काम करणारे, अतिक्रमण करणारे, तसेच रस्ता, पदपथ यांची तोडफोड केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातून पालिकेला उत्पन्न देखील मिळते. मात्र दंड वसुलीसाठी महापालिकेचे अधिकारी उदासीन असल्याचे दिसून येत आहे. शहरासह उपनगर भागात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे वाहनचालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. ड्रेनेज लाइनचे, पिण्याच्या पाण्याचे पाइप लाइन टाकण्याचे काम, अनधिकृत केबल टाकणे, अनधिकृत नळ जोडणी आदी कारणांसाठी रस्ता खोदला जातो. रस्त्याची पाहणी करण्यासाठी तसेच तत्काळ कारवाई करण्यासाठी महापालिकेची कोणतीही यंत्रणा नाही. तसेच कायद्याचा धाक किंवा भीती राहिली नसल्याने अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून भरदिवसा रस्ता खोदला जातो. त्यावर नागरिकांनी तक्रार केली तर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. तसेच कारवाई केली असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र दंड वसुली केली जात नाही. महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पालिकेने कठोर कारवाई करून दंड वसुली करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेने माहिती अधिकारात दिलेले उत्तर
नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १ एप्रिल २०२२ ते ३१ मे २०२३ या दरम्यान विनापरवाना तसेच बेकायदेशीर रस्ते खोदाई प्रकरणी देण्यात आलेल्या नोटिसांची माहिती देण्यात आली आहे. संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी अद्याप किती दंड भरला या बाबतीत माहिती निरंक म्हणजेच कोणतीही माहिती नाही. दंड वसुली करण्याची जबाबदारी ही पथ विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची असते.
बेकायदा खोदलेले रस्ते : आकारण्यात आलेला दंड
विमाननगर भागातील साकोरेनगर रस्ता : १३ लाख १६ हजार ७६३
सोमनाथनगर येथील पदपथाची बेकायदा खोदाई : ७६ लाख ८० हजार ९६०
विमाननगर ते श्री कृष्ण हॉटेल दरम्यानचा रस्ता : २८ हजार २००
विमाननगरमधील साकोरेनगर गल्ली क्रमांक २ रस्ता :
२ लाख ९२ हजार ६०८
दत्त मंदिर चौक ते खालसा डेअरी रस्ता : २५ लाख ६० हजार ३२०
विमाननगर- दिशा स्कायलाईन रस्ता : २ लाख ५६ हजार ०३२
खराडीतील नागपाल रस्ता, दुर्गा माता मंदिर : १४ लाख ६३ हजार ०४०
फिनिक्स मॉल ते श्री कृष्ण हॉटेल : ३६ लाख ५७ हजार ६००
विमाननगर मधील म्हाडाचा रस्ता : ३६ लाख ५७ हजार ६००
गणपती चौक ते न्याती इम्प्रेस पर्यंतचा रस्ता : ५१ लाख २० हजार ६४०
सर्वसामान्य व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी अगदी तत्पर असतात. शहरातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. बेकायदा रस्ते खोदेल जात आहेत. मात्र त्याकडे पालिका डोळेझाक करत आहे. पालिकेकडून माहिती अधिकारातून माहिती घेतली होती. त्यातून पालिकेची ठेकेदारांवर असलेली कृपादृष्टी समोर आली आहे. पुढच्या आठवड्यात या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
- आशिष माने, सामाजिक कार्यकर्ते, वडगावशेरी, मतदारसंघ.
विनापरवाना रस्ता खोदाई केल्यास महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात येते. दंडात्मक कारवाईची नोटीस दिली जाते. वडगाव शेरी मतदारसंघातील भागासह शहरातील विविध भागातील विनापरवाना नोटिसांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. त्यानुसार कारवाईस सुरुवात केली जाणार आहे. ठेकेदार असेल किंवा संबंधित व्यक्तीकडून कायद्यानुसार दंड वसूल करता येतो. दंड देण्यास टाळाटाळ केली तर त्याच्या मालमत्ताकरात त्या रकमेचा समावेश केला जातो.
- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पुणे महापालिका, पथ विभाग.