मुंढवा चौकातील पाच मालमत्तांचा ताबा मिळाला महापालिकेला
अमोल अवचिते
पुणे : खराडी बाय रस्त्यावरील मुंढवा गावातील (Mundhwa Chowk) महात्मा फुले चौकात होणाऱ्या वाहतूक (traffic) कोंडीमुळे नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेकडून (PMC) केली जात आहे. पालिकेने या रस्त्यावरील दोन टप्प्यात अतिक्रमण विरोधी कारवाई करून रस्त्याचे रुंदीकरण केले. काही मिळकती ताब्यात घेण्याला कायदेशीर बाबींचा अडथळा होता. मात्र पालिकेच्या विनंतीला मान देऊन जागा मालक कोंद्रे आणि इतर चार जणांनी एकूण ५ ताबे स्वखुशीने लिहून दिले. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne) यांनी दिली.
मुंढवा चौकातील जागा ताब्यात घेण्यासाठी पालिका गेल्या ३२ वर्षांपासून प्रयत्न करत आहे. कायदेशीर बाबीत अडकलेली जागा सोडल्या तर इतर जागा देखील ताब्यात घेण्यास पालिकेला शक्य होत नव्हते. परंतु सध्याच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याचा विडाच उचलला होता. त्यानुसार दोन टप्प्यात मध्यरात्री कारवाई करून दाखविली. तसेच जागा मालकांना विनंती करून कायदेशीर अडथळे देखील दुरू केले आहेत. हे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे मोठे यश मानले जात आहे. जागा ताब्यात आल्याने मुंढवा चौकातील 'बॉटल नेक' आता दूर होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेत येणार आहे.
उड्डाणपुलापासून मुंढव्यातील महात्मा फुले चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला जागामालकांनी राडाराडा टाकून रस्ता अडवला होता. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अतिक्रमण कारवाई केली जात नव्हती. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी १९ ऑगस्ट महिन्यात धडक कारवाई करुन रेल्वे गेट वरील उड्डाणपुल ते मुंढवा चौक या दरम्यानच्या रस्त्यावरील अतिक्रमण विरोधी कारवाई करत २४ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात आले होते. भूसंपादनाअभावी तब्बल ३२ वर्षे रखडलेल्या मगरपट्टा-खराडी रस्त्यावरील मुंढवा चौकातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न या कारवाईमुळे सुटला. त्यानंतर पुन्हा एकदा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यात चौकातून मुळा-मुठा नदी पर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविले. या कारवाईतुन २४ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात आले होते.. तसेच काही भाग न्यायालयीन लढाईत अडकला असल्याने त्यावर कारवाई झाली नाही. तसेच झाडे तोडण्यात आली नाहीत. मात्र कायदेशीर बाबींवर तोडगा काढून भविष्यात हा रस्ता शंभर टक्के ताब्यात घेतला जाणार होता. त्याला वेळ लागेल असे वाटले असतानाच अवघ्या काही दिवसातच जागा मालकांनी ताबा दिला.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कार्यकारी अभियंता संदीप रणवरे, मुंढवा विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे, भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या प्रतिभा पाटील, प्रसाद काटकर, अधिक्षक अभियंता साहेब दांडगे, कार्यकारी अभियंता संदीप रणवरे, रोहिदास गव्हाणे, अतिक्रमण विभागाचे, उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.