पुणे शहरातील बेवारस वाहनांवर महापालिकेची कारवाई, आतापर्यंत २२ वाहने जप्त
पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला आणि फूटपाथवर उभ्या असलेल्या बेकायदेशिर तसेच बंद पडलेल्या वाहनांवर महापालिका कारवाई करणार आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे, त्यामुळे महापालिकेने अशी वाहने जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत आतापर्यंत २२ वाहने जप्त करण्यात आली आहेत. महापालिकेकडून नागरिकांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना हटविण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अशातच नागरिक बंद पडलेल्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावतात. यामुळे वाहतूकीत आणखी भर पडते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या येत्या ७ दिवसात नागरिकांनी हटवाव्यात, अन्यथा जप्त केल्या जातील, असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिकेने वाहने जप्त केल्यास नागरिकांना ती पुन्हा मिळविता येणार आहे. मात्र, त्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. तसेच केवळ एक महिन्याच्या आतमध्ये ही वाहने सोडवता येणार आहेत. जप्त केलेल्या वाहनातील प्रवासी बस आणि ट्रकसाठी २५ हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर हलक्या वाहनांसाठी २० हजार रुपये (१० टनांपर्यंत), कार आणि जीपसाठी १५ हजार रुपये, रिक्षा आणि टेम्पोसाठी १० हजार रुपये आणि दुचाकींसाठी ५ हजार रुपये शुल्क भरावे लागणार आहेत.
महापालिकेच्या अतिक्रमन विरोधी विभागाकडून गेल्या आठवड्यापासून या मोहीमेला सुरूवात करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत पालिकेने २२ वाहने जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या १८ वाहनधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पुढील कामकाज सुरळीत करण्यासाठी सोमवारपासून प्रत्येक प्रादेशिक कार्यालयात स्वतंत्र क्रेन पुरवल्या जातील, अशी माहिती अतिक्रमण विरोधी विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.