संग्रहित छायाचित्र
पुणे : शहरातील हवा प्रदूषण वाढल्याने महापालिकेकडून उपाय योजना केल्या जात आहेत. बांधकामांमुळे शहरात हवा प्रदूषण वाढल्याचे मुख्य कारण सांगितले जात आहे. त्यामुळे महापालिकेने बांधकाम व्यवसायिकांना नोटीसा पाठविण्यास सुरुवात केली त्यासोबतच कचरा जाळणाऱ्यांवर महापालिकेने कडक पावले उचलत २५ दिवसात ८० जणांवर कारवाईचा बगडा उगारला आहे. तर वेगवेगळ्या कारवाईतून तब्बल १२ लाख ९८ हजार २३० रुयये दंडाची वसूली केली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत. त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढल्याने हवा प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. कचरा जाळल्यामुळे त्यात भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्तात आले आहे. पुण्यातील हवा अधिक प्रदूषित असल्याचेही समोर आले आहे. पुण्यासह देशातील शहरांमध्ये हवा प्रदूषण वाढले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश तसेच मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कचरा टाकणे व जाळणे याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र महापालिकेच्या कारवाया थंड पडल्याचे दिसून येत होते. मागच्या आठवड्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीच चर्चा झाली. बैठकीत सूचना दिल्या प्रमाणे महापालिकेच्या सर्वच विभागाकडून कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत. शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच कचरा जाळण्यात येऊ नये यासाठी घनकचरा विभागाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार गेल्या महिनाभरात ८० जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५० हजार रुपये दंड वसूली करण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, घाण केल्यास, प्लास्टीकच्या पिशव्या वापरणे, लघुशंका अथवा शौचास बसणाऱ्यांना जागेवरच दंड आकारण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यांचा वापर करून महापालिकेने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. त्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके तैनात केली आहेत. तब्बल ३ हजार जणांवर पुणे महापालिकेकडून गेल्या महिनाभरात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितली.
शहरातील मोठ्या सोसायट्या, आस्थापना आणि शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्यांनी आपल्याच परिसरात ओला व सुका कचरा जिरविण्याचे महापालिकेने यापूर्वीच आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता घरासमोर येणाऱ्या घंटा गाड्यांमध्ये कचरा जमा करावा. तसेच स्वच्छ संस्थेकडून देखील कचरा संकलीत करण्याचे काम केले जात आहे. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरातील कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने सांगितले.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई
गोळा केलेला कचरा जाळण्यात येऊ नये. तो कचरा गाड्यांमध्ये जमा करण्यात यावा, अशा सूचना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतरही अनेक सफाई कर्मचारी कचरा गोळा केल्यानंतर एका कोपऱ्याला कचरा जाळतात. अशा तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानुसार कारवाई करण्यात येत होते. हडपसर क्षेत्रिय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. असे प्रशासनाने सांगितले.
महापालिकेने कडक कारवाई केल्याशिवाय रस्त्यावर कचरा टाकणे बंद होणार नाही. अनेकांकडून तांबे मिळविण्यासाठी वायर उघड्यावर जाळले जातात. त्यामुळे घाण वास आणि असह्य असा धूर हवेत पसरतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. अशा वायर जाळणाऱ्यांवर मनुष्याच्या जीवा धोका निर्माण करणे या कलमा नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करायला हवा.
- राजाभाऊ पाटूळे, नागरिक.
महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना स्वच्छता राखण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. भविष्यात अशीच कडक कारवाई करण्यात येणार आहे.
- संदीप कदम, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका.
१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यानची कारवाई
कारण : किती जणांवर : दंड वसूली (रुपयात)
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे: ४५: ४५ हजार
सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे: ९६ : १८ हजार ७६०
कचरा जाळणे: ८०: ५० हजार
वर्गीकृत कचरा न देणे : १८७: २७ हजार २७०
घरगुती कचरा स्वच्छला न देणे: ३ : ३६०
सार्वजनिक ठिकाणी कचरा/ अस्वच्छता करणे: २ हजार ९७५: ८ लाख ८३ हजार ४०
बांधकाम राडारोडा: १४ : ६९ हजार ५००
गणवेश परिधान न करणे : १८: ३६००
प्लास्टिक कारवाई : ३४: १ लाख ७५ हजार
इतर पाळीव प्राण्याद्वारे अस्वच्छता करणे : २ : ७००
एकूण ३४५८: १२ लाख ९८ हजार २३०