संग्रहित छायाचित्र
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्यात महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
सामंजस्य करारावर बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. जयराज किदव यांनी बार्टीच्या पुणे येथील कार्यालयात स्वाक्षरी केली. यावेळी एनआयईएलआयटीचे सहसंचालक डॉ. लक्ष्मण कोर्रा, उपजिल्हाधिकारी आणि बार्टीच्या कौशल्य विकास विभागाचे प्रमुख अनिल कारंडे, कार्यालय अधीक्षक प्रज्ञा मोहिते, प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई उपस्थित होते.
हा उपक्रम म्हणजे बार्टीच्या कौशल्य विकास विभागाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या कौशल्य उन्नतीसाठी तसेच आयटी आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी टाकलेले महत्वपूर्ण पाऊल आहे. अनुसूचित जातीच्या उमेदवारांचे कौशल्य आणि संसाधने एकत्र करून, दोन्ही संस्था कौशल्यातील अंतर भरून काढण्यासाठी आणि दर्जेदार प्रशिक्षणाद्वारे अनुसूचित जातीच्या उमेदवारांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न करणार आहेत.
एनआयईएलआयटी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना औरंगाबाद केंद्रावर एकूण ६८ अभ्यासक्रम उपलब्ध करेल. प्रशिक्षण कार्यक्रम निवासी आणि अनिवासी पद्धतीने असतील. सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा अॅनालिटिक्स , अँड्रॉइड ॲप डेव्हलपर, पायथन वापरून मशीन लर्निंग, वेब डेव्हलपर, सिस्टम आणि नेटवर्किंग स्पेशलिस्ट, मल्टीमीडिया डेव्हलपर, इंटरनेट ऑफ थिंग्ज, इंडस्ट्रियल ऑटोमेशन, कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स, एम्बेडेड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट हे अभ्यासक्रम ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होतील.
आत्तापर्यंत बार्टीच्या कौशल्य विकास विभागाने राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या कुटुंबांच्या उपजीविकेच्या संधी उंचावण्यासाठी आणि उत्पन्नाची पातळी वाढवण्यासाठी अनेक उपक्रम घेतले आहेत. बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांचा तरुणांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक वारे यांनी केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.